पुणे : फसवणुकीच्या ‘लोन अ‍ॅप’ला हातकडी; पुणे पोलिसांनी 1 लाख नागरिकांना वाचवले | पुढारी

पुणे : फसवणुकीच्या ‘लोन अ‍ॅप’ला हातकडी; पुणे पोलिसांनी 1 लाख नागरिकांना वाचवले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: सायबर पोलिसांनी महाराष्ट्रासह बंगळुरूतील लोन अ‍ॅपचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त करीत मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक साहित्यासह डेटा जप्त केला. त्यामध्ये तब्बल एक लाख नागरिकांना आर्थिक गंडा घालून छळवणूक करण्याच्या तयारीत हे लोन अ‍ॅपवाले होते, असे समोर आले आहे. मात्र, पुणे पोलिसांनी वेळीच कारवाई केल्यामुळे या सर्व लोकांची नंतर होणार्‍या छळवणुकीतून सुटका झाली आहे.

दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणासुध्दा याबाबत तपास करीत आहे. लोन अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांना धमकावून खंडणी उकळणार्‍या टोळ्या देशभरात सक्रिय आहेत. पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने बंगळुरूत एका कॉल सेंटरवर छापा टाकून अकरा जणांना अटक केली. त्यानंतर लोन अ‍ॅपसाठी बँक खात्याचा वापर करणार्‍या आठ जणांना पुण्यातील खराडी, सोलापूर आणि बंगळुरूतून बेड्या ठोकल्या. या फसवणूक करणार्‍यांमध्ये दुबईत वास्तव्यास असलेल्या चिनी नागरिकांची टोळी सामील असल्याची माहिती समोर आली आहे.

लोन अ‍ॅप फसवणुकीचे लोण संपूर्ण देशभर पसरले आहे. एकट्या पुणे शहरात प्रत्येक दिवशी 25 ते 30 तक्रारी लोन अ‍ॅपसंदर्भात दाखल होत आहेत. गरजेपोटी कमी वेळात मिळालेल्या लोनच्या मोहाला बळी पडून अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी वारजे परिसरात नातीने लोन अ‍ॅपचे कर्ज फेडण्यासाठी आपल्या आजीचा खून करून चोरी झाल्याचा बनाव रचला, तर विमानतळ परिसरात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या टोळ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश सायबर पोलिसांना दिले. तक्रारींचे निराकरकण करण्यासाठी स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकाने बंगळुरूतील एका कॉल सेंटरवर छापा टाकून अकरा जणांना अटक केली, अशी माहिती गुप्ता यांनी शुक्रवारी (दि. 30) पत्रकार परिषदेत दिली. सायबर गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलिस आयुक्त विजयकुमार पळसुले या वेळी उपस्थित होते.

बंगळुरूतील कॉल सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी आरोपींना अटक केली. दरम्यान, मजुरांना फसवून त्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून इंटरनेट बँकिंग सुविधा असलेले बँक खाते उघडण्यात आले होते. या खात्यांचा तपशील बंगळुरूमधील टोळीला पुरविणार्‍या आठ जणांना पोलिसांनी खराडी, पुणे शहर, सोलापूर आणि बंगळुरूतून अटक करण्यात आली. न्यायालयाने 18 आरोपींना दहा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

या टोळीकडून 48 मोबाईल संच, 56 बँक खात्यांची कागदपत्रे, एक संगणक, एक लॅपटॉप, 27 बँक खातेपुस्तिका, सिम कार्ड, 167 क्रेडिट आणि डेबिट कार्ड, 15 पॅन कार्ड, 11 मतदार ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मीनल सुपे पाटील, पोलिस निरीक्षक कुमार घाडगे, सहायक पोलिस निरीक्षक शिरीष भालेराव, बलभीम ननवरे, किरण मदने, कादिर देशमुख, उपनिरीक्षक अनिल डफळ, चित्रा चौधरी, प्रवीण भोपळे, कर्मचारी नितीन चांदणे, नवनाथ जाधव, अमोल कदम, अनिकेत भिंगारे,
योगेश वाव्हळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

देशभरात फसवणुकीचे जाळे
लोन अ‍ॅपच्या माध्यमातून फसवणूक करणार्‍या अनेक टोळ्या देशभरात सक्रिय आहेत. सिम कार्ड उपलब्ध करून देणे, लोन अ‍ॅप तयार करून बँक खात्यांचा तपशील देणे, कॉल सेंटर चालविणे, अशा गैरप्रकारांत अनेक जण सामील आहेत. दुबईत वास्तव्यास असणारे चिनी चोरटे मुख्य सूत्रधार असल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे. बंगळुरूतून अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे एक लाख नागरिकांची वैयक्तिक माहिती असलेला डेटा मिळाला आहे. आरोपींच्या बँक खात्यांतील 70 लाखांची रक्कम गोठविण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांत लोन अ‍ॅपच्या माध्यमातून फसवणूक केल्याप्रकरणी पुणे शहर आणि जिल्ह्यातून 4 हजार 774 तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत.

अशी होती मोडस ऑपरेंडी…
एखाद्या संघटित टोळीत ज्याप्रमाणे काम चालते, तशीच या टोळ्यांची कार्यपद्धती आहे. प्रत्येक विभागाला वेगळे काम देण्यात आले असून, त्यामध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड काढून देणारे, विविध व्यक्तींची गोपनीय माहिती चोरी करून बँक खाते उघडून आर्थिक व्यवहार करणारे, फसवणुकीच्या विळख्यात अडकविण्यासाठी नागरिकांचा डेटा गोळा करणारे, लोन अ‍ॅप तयार करणारी टेक्निकल टीम, एवढेच नाही तर भारतीय नागरिकांकडून खंडणी स्वरूपात जमा केलेला पैसा बिटकॉइन तसेच इतर चलनाच्या स्वरूपात रूपांतरित करून विदेशात पाठवणारी टीम, अशा पद्धतीने हे सर्व कामकाज चालते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या सर्व व्यक्ती कधीच एकमेकांच्या संपर्कात नसतात.

लोन अ‍ॅपच्या माध्यमातून गोळा झालेला पैसा आभासी चलनात (बिटकॉइन, क्रिप्टो करन्सी) रूपांतरित करून थेट विदेशात जात असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात याची पाळेमुळे चीन आणि दुबईपर्यंत असल्याचे देखील दिसून आले आहे.

                     – भाग्यश्री नवटके, पोलिस उपायुक्त, आर्थिक गुन्हे व सायबर शाखा.

लोन अ‍ॅप हा ट्रॅप असून, दररोज 30 ते 35 तक्रारी पुणे सायबर पोलिसांकडे येत आहेत. हा एक चक्रव्यूह आहे. नागरिकांनी याबाबत सतत सतर्क राहिले पाहिजे. कोणत्याही लोनच्या प्रलोभनाला बळी पडू नये. जर अशी फसवणूक झाली तर दुसरा कोणताही विचार न करता थेट सायबर पोलिसांत तत्काळ तक्रार दाखल करा.

                                              – अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त, पुणे शहर

 

Back to top button