T20 WC : टी-२० विश्वचषक जिंकणारा संघ होणार मालामाल, ICC ने जाहीर केली बक्षिसाची रक्कम | पुढारी

T20 WC : टी-२० विश्वचषक जिंकणारा संघ होणार मालामाल, ICC ने जाहीर केली बक्षिसाची रक्कम

पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदा होणाऱ्या टी-२० विश्वचषक (T20 WC) स्पर्धाच्या बक्षिसांची रक्कम आसीसीने जाहीर केली आहे. स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला $१.६ दशलक्ष म्हणजेच सुमारे १३.०५ कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत. तसेच अंतिम सामन्यात पराभव झालेल्या संघाला $८00,000 म्हणजे सुमारे ६.५२ कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) शुक्रवारी ( दि.३० सप्टेंबर) आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेची बक्षीस रक्कम जाहीर केली. या वर्षी चषकावर आपले नाव कोरणाऱ्या संघाला $१.६ दशलक्ष म्हणजे सुमारे १३.०५ कोटी रुपये मिळणार आहेत. तसेच, अंतिम फेरीत हरणाऱ्या संघाला $८00,000 म्हणजे सुमारे ६.५२ कोटी रुपये दिले जाणार आहेत. टी-२० विश्वचषक स्पर्धेला १६ ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना १३ नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे. (T20 WC)

टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या एकूण बक्षीस रक्कमेबद्दल बोलायचे तर ते $५.६ दशलक्ष म्हणजे ४५.६८ कोटी रुपये आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांना ठराविक रक्कम बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. पहिल्या फेरीत बाद होणारे संघही लाखो रुपये घेऊन घरी जातील. गेल्या वर्षीच्या टी-२० विश्वचषकाच्या तुलनेत यावेळी बक्षिसाच्या रकमेत वाढ झालेली नाही.

उपांत्य फेरीत बाद होणाऱ्या संघाला मिळणार ३.६ कोटी रूपये

उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या दोन्ही संघांना $४00,000 म्हणजे सुमारे ३.६ कोटी रुपये दिले जाणार आहेत. विश्वचषकातील सामने हे जिलॉन्ग, होबार्ट, सिडनी, पर्थ, मेलबर्न, ब्रिस्बेन आणि अॅडलेड या मैदानांवर खेळवले जाणार आहेत. २२ ऑक्टोबरपासून सुपर-१२ फेरीचे सामने खेळवले जातील. या स्पर्धेत एकूण ४५ सामने खेळवले जाणार आहेत.

सुपर-१२ मध्ये आधीच आठ संघांचा समावेश

सुपर-१२ टप्प्यातून बाहेर पडलेल्या आठ संघांना $७0,000 (अंदाजे ५७.०८ लाख रुपये) मिळणार आहेत. सुपर-१२ मधील संघांचे ३० सामने खेळवले जाणार आहेत. या फेरीतील प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला $४0,000 म्हणजे सुमारे ३२.६३ लाख रुपये दिले जाणार आहे. अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका हे संघ आधीच सुपर-१२ मध्ये आहेत.

चार संघ पहिल्याच फेरीत पडतील बाहेर

पहिल्या फेरीचे सामने सुपर-१२ पूर्वी होणार आहेत. त्यात आठ संघांचा समावेश असेल. यातील पराभव झालेले चार संघ स्पर्धेतून बाहेर पडतील. बाहेर पडणाऱ्या संघांना $४0,000 म्हणजेच सुमारे ३२.६३ लाख रुपये बक्षीस मिळणार आहे. नामिबिया, नेदरलँड्स, श्रीलंका, यूएई, आयर्लंड, स्कॉटलंड, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेचे संघ पहिल्या फेरीत खेळणार आहेत.

हेही वाचा;

Back to top button