माळीचिंचोरा फाट्यावरील अपघातात तरुणाचा मृत्यू | पुढारी

माळीचिंचोरा फाट्यावरील अपघातात तरुणाचा मृत्यू

नेवासा/कुकाणा : पुढारी वृत्तसेवा : नगर- औरंगाबाद महामार्गावरील माळीचिंचोरा फाट्यावर फॉर्च्युनर गाडी व मोटरसायकलच्या झालेल्या अपघातात तरूणाचा जागीच मृत्यू झाला. माळीचिंचोरा येथील संकेत लक्ष्मण पुंड (वय 19) असे त्या तरूणाचे नाव आहे.
सकाळी 12 वाजता आपल्या आत्याला माळीचिंचोरा फाट्यावरील बसथाब्यावर सोडून (एम.एच.17 सी.एस. 6995) मोटारसायकलवरून रस्ता पार करत असताना औरंगाबादहून नगरच्या दिशेने जाणार्‍या (एम.एच. 20 एफ.जी. 6810) या फॉर्च्युनरची जोराची धडक लागली. या अपघातात संकेत पुंड याच्या डोक्याला जबर मार लागल्याने जखमी होऊन बेशुद्ध झाला.

यावेळी आसपासच्या नागरिकांनी त्याला नेवासा फाट्यावरील रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. गावात विविध कार्यकारी सेवा सोसायटीची सर्वसाधारण सभा सुरू होती. या घटनेची माहिती मिळताच सभेसाठी उपस्थित असलेल्या सर्व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती पोलिस निरीक्षक विजय करे यांना मिळताच, त्यांनी पोलिस अधिकार्‍यांना पाठवून घटनास्थळाचा पंचनामा केला. माळीचिंचोरा येथे सायंकाळी पाच वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत संकेत हा आई-वडिलांना एकुलता एक आसल्याने गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रात्री उशिरापर्यंत नेवासा पोलिस ठाण्यात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Back to top button