Stock Market Updates | आरबीआयच्या रेपो रेट वाढीमुळे सेन्सेक्स, निफ्टी तेजीत, बँका, वित्तीय कंपन्यांचे शेअर्स वधारले | पुढारी

Stock Market Updates | आरबीआयच्या रेपो रेट वाढीमुळे सेन्सेक्स, निफ्टी तेजीत, बँका, वित्तीय कंपन्यांचे शेअर्स वधारले

Stock Market Updates : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून पतधोरण जाहीर होताच भारतीय शेअर बाजारात गेल्या सात दिवसांपासून सुरु असलेली घसरण थांबली. सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत आले आहेत. आज शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स १५० अंकांनी खाली येऊन खुला झाला होता. पण आरबीआयकडून पतधोरण जाहीर होताच त्यात वाढ झाली. सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी वाढून ५६,९०० वर व्यवहार करत आहे. तर निफ्टी १४५ हून अधिक अंकांनी वधारुन १६,९०० वर व्यवहार करत आहे. विशेषतः आरबीआयचे पतधोरण जाहीर झाल्यानंतर बँका आणि वित्त विषयक कंपन्यांचे शेअर्स वधारल्याचे दिसून आले.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गर्व्हनर शक्तिकांता दास यांनी आज शुक्रवारी पतधोरण जाहीर केले. आरबीआयने सलग चौथ्यांदा रेपो रेटमध्ये (RBI hikes repo rate) वाढ केली आहे. यावेळी रेपो रेटमध्ये ५० बेसिक पॉईंट्सची वाढ केली आहे. यामुळे कर्जाचा हप्ता महागणार आहे. आरबीआयने मे पासून चारवेळा रेपो दरात वाढ केली आहे. सध्याचा रेपो रेट ५.४० टक्के आहे. यात ५० बेसिक पॉईंट्सची वाढ केल्याने रेपो दर ५.९० टक्क्यांवर पोहोचला आहे. वाढती महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी रेपो दरात वाढ केली जात असल्याचे आरबीआयचे म्हणणे आहे. रेपो दरात वाढ केल्याने गृह, कार आणि वैयक्तिक कर्जासाठी EMI देखील वाढण्याची शक्यता आहे. यामुळे गृह, कार आणि वैयक्तिक कर्जे अधिक महाग होणार आहेत.

२०२३ आर्थिक वर्षासाठी वास्तविक GDP अंदाज ७ टक्के आणि महागाई दर ६.७ टक्के एवढा राहील, असे शक्तिकांता दास यांनी म्हटले आहे. पतधोरण समितीने (MPC) सप्टेंबरच्या बैठकीत २०२३ आर्थिक वर्षासाठी वास्तविक जीडीपी अंदाज ७ टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला होता. २०२३ आर्थिक वर्षाच्या (Q2FY23) दुसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढ ६.३ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ४.६ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ४.६ टक्के राहणार असल्याचे आरबीआयने म्हटले होते.

या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढ अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे दिसून आले. सध्या महागाई दर ७ टक्क्यांच्या आसपास आहे आणि या वर्षाच्या उत्तरार्धात ती सुमारे ६ टक्क्यांवर राहण्याची अपेक्षा असल्याचे शक्तिकांता दास यांनी म्हटले आहे. (Stock Market Updates)

हे ही वाचा :

Back to top button