मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गर्व्हनर शक्तिकांता दास यांनी आज शुक्रवारी पतधोरण जाहीर केले. आरबीआयने सलग चौथ्यांदा रेपो रेटमध्ये (RBI hikes repo rate) वाढ केली आहे. यावेळी रेपो रेटमध्ये ५० बेसिक पॉईंट्सची वाढ केली आहे. यामुळे कर्जाचा हप्ता महागणार आहे. आरबीआयने मे पासून चारवेळा रेपो दरात वाढ केली आहे. सध्याचा रेपो रेट ५.४० टक्के आहे. यात ५० बेसिक पॉईंट्सची वाढ केल्याने रेपो दर ५.९० टक्क्यांवर पोहोचला आहे. वाढती महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी रेपो दरात वाढ केली जात असल्याचे आरबीआयचे म्हणणे आहे. रेपो दरात वाढ केल्याने गृह, कार आणि वैयक्तिक कर्जासाठी EMI देखील वाढण्याची शक्यता आहे. यामुळे गृह, कार आणि वैयक्तिक कर्जे अधिक महाग होतील.
या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढ अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे दिसून आले. तरीही ही वाढ १३.५ टक्के होती आणि ही वाढ प्रमुख जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक असल्याचे शक्तिकांता दास यांनी म्हटले आहे. सध्या महागाई दर ७ टक्क्यांच्या आसपास आहे आणि या वर्षाच्या उत्तरार्धात ती सुमारे ६ टक्के वर राहण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
किरकोळ चलनवाढीचा दर जुलैमधील ६.७१ टक्क्यांवरून ऑगस्टमध्ये ७ टक्क्यांवर पोहोचला. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचा व्याजदर मे महिन्यातील १ टक्क्यांवरून केवळ पाच महिन्यांत ३.२५ टक्क्यांच्या गेला आहे. डिसेंबर २०२२ मध्ये हे व्याजदरवाढीचे लक्ष्य ४ टक्के आहे. अमेरिकेने किरकोळ चलनवाढीचा दर २ टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे. जे सध्या ८ टक्क्यांवर आहे.
याआधी ऑगस्टमध्ये RBI ने रेपो रेट ५० बेस पॉईंट म्हणजे ०.५० टक्क्याने वाढवला होता. यामुळे रेपो रेट ५.४० टक्क्यांवर गेला होता. यामुळे कर्जे महागली होती. त्याआधी फेब्रुवारीत आरबीआयने रेपो रेट ०.४० टक्क्याने वाढवला होता. त्यानंतर ८ जून रोजी झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीत आरबीआयने रेपो दर ५० बेसिस पॉइंट्सने वाढवून ४.९० टक्के केला होता. (RBI hikes repo rate)
हे ही वाचा :