Income Tax Return : गुंतवणूक अधिक असल्यास…

Income Tax Return : गुंतवणूक अधिक असल्यास…
Published on
Updated on

आर्थिक वर्ष 2022 साठी प्राप्तिकर विवरण (Income Tax Return) दाखल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 होती. आपली डेडलाईन चुकली असेल, तर 31 डिसेंबरपर्यंत दंडासह आयटीआर दाखल करू शकता.

आपण एक गुतंवणूकदार असाल आणि शेअर बाजारात नियमितपणे शेअरची खरेदी आणि विक्री करत असाल, तर रिटर्न भरणे अनिवार्य आहे. प्राप्तिकर नियमानुसार म्युच्युअल फंड, स्टॉक, बाँड किंवा डिंबेचरमधील गुंतवणूक ही एका आर्थिक वर्षात दहा लाखांपेक्षा अधिक असेल, तर आयटीआरमध्ये त्याची माहिती द्यावी लागेल. अर्थात प्राप्तिकर विभाग हा आपल्या जादा रकमेच्या व्यवहाराबाबत सर्व काही जाणून असतो.

आपण त्याचा उल्लेख करा किंवा करू नका, तो आपल्या व्यवहारावर ट्रॅक ठेवून असतो. याशिवाय एखाद्या व्यक्तीकडून स्पेसिफिक फायनान्शिअल ट्रान्झेक्शन होत असेल तर त्यावर लक्ष ठेवण्यासाठी प्राप्तिकर विभाग वेगवेगळ्या प्रकारचा डेटा अ‍ॅनालिसीस तंत्राचा वापर करते. म्हणून म्युच्युअल फंड, स्टॉक, बाँड किंवा डिंबेचरमधील गुंतवणूक ही एका वर्षात दहा लाखांपेक्षा अधिक असेल तर त्याचा उल्लेख आयटीआरमध्ये करावा लागेल. एखादा कारदाता अशी गुंतवणूक लपवत असेल, तर तो प्राप्तिकर खात्याच्या नजरेतून सुटणार नाही. कारण अशा गुंतवणुकीचे विवरण हे आयटीआरच्या अ‍ॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट (एआयएस) आणि फॉर्म 26 एएसमध्ये दिसते. यानुसार प्राप्तिकर खात्याला त्याची माहिती मिळते.

सेक्शन 143 आणि 148 नुसार नोटीस (Income Tax Return)

एखादी व्यक्ती आयटीआर भरत नसेल किंवा गुंतवणुकीसंदर्भात योग्य माहिती गरजेनुसार देत नसेल, तर करविभाग दंडात्मक कारवाई करू शकतो. गुंतवणूकदार किंवा करदात्याला प्राप्तिकर खात्याच्या कलम 143 आणि 148 अंतर्गत नोटीस मिळू शकते. नोटिसीच्या माध्यमातून प्राप्तिकर खाते हे वेगवेगळ्या गुंतवणुकीची माहिती मागवू शकतात. त्याचे स्रोत जाणून घेऊ शकतात.

प्राप्तिकराच्या नोटिसीपासून बचाव कसा करावा?

काही करदाते किंवा गुंतवणूकदार हे उत्पन्नाचा स्रोत लपवून देतात. कर कमी करण्यासाठी आयटीआरमध्ये कमी उत्पन्न दाखवतात. परंतु प्राप्तिकर खात्याला या व्यवहाराची संपूर्णपणे माहिती असते म्हणूनच आयटीआर भरताना उत्पन्न आणि गुंतवणुकीचे स्रोत सांगणे उपयुक्त ठरेल. शेअर किंवा सिक्युरिटीजबाबत नोटीस मिळणार नाही, यासंदर्भात काही गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे.

मुदतीच्या आत आयटीआर दाखल करणे

सर्व टीडीएसची एंट्री क्रॉस चेक करायला हवी आणि त्याची खातरजमा करायला हवी. आपल्याला फॉर्म 26 एएसमध्ये दाखविलेली रक्कम अचूक आहे की नाही, ते पाहा.
आयटीआर दाखल करण्यापूर्वी एआयएस व्हेरिफाय करायला हवा.
एका आर्थिक वर्षात गुंतवणुकीची रक्कम दहा लाखांपेक्षा अधिक असेल, तर शेअर आणि सिक्युरिटीमध्ये असणार्‍या गुंतवणुकीची माहिती द्यावी लागेल.
कर आकारणी होत असेल आणि ती योग्य रितीने आहे का आणि त्याचा कर भरला आहे का? याची खातरजमा करून घ्यावी.
सर्व प्रकारचे जादा रकमेचे व्यवहार, गुंतवणूक आणि खर्च याचे रेकॉर्ड ठेवायला हवे.

ई-अभियान

करदात्याच्या व्हॉलेंटरी कम्प्लायन्सला चालना देण्याच्या उद्देशाने प्राप्तिकर खात्याने करदात्यांच्या सुविधांसाठी ई-अभियान सुरू केले आहे. हे अभियान रिटर्न फाईल न करणार्‍या मंडळींसाठी उपयुक्त आहे. तसेच ज्यांच्या उत्पन्नाच्या विवरणात उणिवा असतील, तर त्यांना या अभियानातून मदत केली जाणार आहे. या अभियानांतर्गत विविध स्रोत जसे की एसएफटी, टीडीएस, टीसीएस आदींपासून मिळणार्‍या माहितीच्या आधारे व्हेरिफिकेशन केले जाईल आणि नंतर संबंधितास ई-मेल आणि एसएमएस पाठविला जाईल.

प्राप्तिकर खात्याकडून सूचना मिळाल्यानंतर त्यास तत्काळ प्रतिसाद द्यायला हवा. मग आयटीआर योग्य रितीने भरलेला असला तरीही. यानुसार भविष्यात प्राप्तिकर खात्याची नोटीस येणार नाही. अर्थात प्राप्तिकर खाते हे ई-अभियान कम्युनिकेशनमध्ये करदात्याच्या उत्तराबाबत समाधानी नसेल, तर आयटीआरचे अवलोकन केले जाईल आणि सेक्शन 143 (1) अंतर्गत नोटीस जारी करेल. नोटीस मिळाल्यानंतर जादा व्यवहारावर लागू केलेला अतिरिक्त कर भरावा लागेल.

प्रसाद पाटील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news