बाळावर शस्त्रक्रिया ? पुण्यातील ससून रुग्णालयात जा ! ‘वायसीएम’ला मिळेना बालरोग शल्यचिकित्सक | पुढारी

बाळावर शस्त्रक्रिया ? पुण्यातील ससून रुग्णालयात जा ! ‘वायसीएम’ला मिळेना बालरोग शल्यचिकित्सक

राहुल हातोले :  पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या 25 लाखांहून अधिक आहे. मात्र, वैद्यकीय यंत्रणा नागरिकांच्या सेवेत अपुरी पडत आहे. वायसीएमसारख्या रुग्णालयाला गेल्या चार वर्षांपासून बालरोग शल्यचिकित्सकच मिळेना. त्यामुळे नागरिकांना खासगी किंवा ससून रुग्णालय गाठावे लागत आहे. पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना नाहकपणे तीस ते चाळीस किलोमीटरचा हेलपाटा मारून शारीरिक, मानसिक आणि आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. यावर उपाययोजना कधी केली जाईल, असा प्रश्न शहरातील सामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.

माझ्या 12 वर्षांच्या मुलाला रात्रीच्या वेळेस सापाने चावा घेतला. झोपेत असल्याने त्याला त्रास जाणवला नाही; मात्र पहाटे त्याच्या पायाला मोठी सूज आली होती. पाय काळा पडला होता. म्हणून आम्ही लगेचच वायसीएम रुग्णालय गाठले. डॉक्टरांनी सांगितले बाळाच्या पायाची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. मात्र, रुग्णालयात शल्यचिकित्सकच नसल्याने ससूनला जावे लागेल. यानंतर परत आम्ही धावपळ करीत ससून गाठले. तेव्हा ससूनमधील डॉक्टर आम्हालाच ओरडले की, आणखी थोडा विलंब केला असता, तर मुलाचा पाय कापावा लागला असता.
                                                             – एक नागरिक, चिंचवड.

मुलीच्या पोटात दुखू लागल्याने सोनोग्राफी केली. त्यामध्ये अपेंडिक्स असल्याचे निदान झाले. त्याची वाढ अधिक झाल्याने शस्त्रक्रियेचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यासाठी खासगी रुग्णालयाचा खर्च परवत नसल्याने वायसीएममध्ये दाखल करण्याचे ठरले. मुलीला घेऊन रुग्णालयात आलो; मात्र वायसीएममध्ये बालरोग शल्यचिकित्सक नसल्याने तुमच्या मुलीची शस्त्रक्रिया होऊ शकत नाही. तुम्हाला ससूनमध्ये दाखल करावे लागेल, असे वायसीएममधील डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे आम्ही मुलीला ससूनमध्ये दाखल करून घरापासून 30 किलोमीटरचा हेलपाटा मारत उपचार घेतले.                                            – एक नागरिक, चिखली.

बालरोग शल्यचिकित्सकाची आवश्यकता काय?
एक ते तेरा वर्ष वयोगटातील बालकांना अपेंडिक्स, मेंदूच्या शस्त्रक्रिया, फुफ्फुसाचा दाह, छातीच्या शस्त्रक्रिया, साप-विंचू आदी सरपटणार्‍या प्राण्यांनी चावा घेऊन अधिक वेळ उलटून गेल्याने शस्त्रक्रिया करण्याची गरज भासते. आदींसह अनेक शस्त्रक्रियांसाठी बालरोग शल्यचिकित्सकांची आवश्यकता भासत आहे.

बालरोग शल्यचिकित्सक पदासाठी जाहिराती देऊन झाल्या आहेत. मात्र, खासगी रुग्णालयांमध्ये त्यांना गलेलठ्ठ पगार दिले जातात, परिणामी वायसीएममध्ये ठरलेले पगार तुलनेत कमी पडत असल्याने काम करण्यासाठी शल्यचिकित्सक तयार होत नाहीत.
  – डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता पदव्युत्तर संस्था,  वायसीएम रुग्णालय, पिंपरी.

Back to top button