‘पीएफआय’च्या देशभरातील विविध ठिकाणांवर छापे : दोनशेहून अधिक संशयितांना अटक | पुढारी

'पीएफआय'च्या देशभरातील विविध ठिकाणांवर छापे : दोनशेहून अधिक संशयितांना अटक

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात ‘पीएफआय’च्या देशभरांतील ठिकाणांवर मंगळवारी पुन्हा तपास संस्थांनी संबंधित राज्यांतील पोलिसांच्या मदतीने छापे टाकले. या छाप्यांदरम्यान दोनशेपेक्षा जास्त संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे अथवा अटक करण्यात आली आहे.

‘पीएफआय’च्या ९ राज्यांतील ठिकाणांवर ही कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, दिल्ली, केरळ, गुजरात, कर्नाटक आणि आसाम या राज्‍यांमध्‍येही कारवाई झाली. कर्नाटकातून सर्वाधिक 72 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे अथवा अटक करण्यात आली आहे. त्यााठोपाठ उत्तर प्रदेशात 44, महाराष्ट्रात 43, दिल्लीत 32, आसाममध्ये 45, गुजरातमध्ये 15 तर मध्य प्रदेशात 21 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. ठोस पुराव्यांच्या आधारे वरील लोकांवर कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

मध्य प्रदेशातील भोपाळ आणि इंदोरमध्ये विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली. इंदोरमधून 3 संशयितांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्रात औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, जालना आणि परभणी आदी ठिकाणी दहशतवादविरोधी पथक तसेच स्थानिक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. देशाची राजधानी दिल्लीत निजामुद्दीन आणि रोहिणी या ठिकाणी पोलिसांच्या विशेष पथकाने दिवसभर छापेमारी करुन संशयितांना ताब्यात घेतले.

राष्ट्रीय तपास संस्थेने याआधी 22 सप्टेंबर रोजी पीएफआयच्या देशभरातील ठिकाणांवर छापे टाकले होते. त्यावेळी 15 राज्यांमध्ये 93 ठिकाणी कारवाई करण्यात आली होती. कारवाईदरम्यान 106 नेते आणि कार्यकर्त्यांना अटक झाली होती. यानंतर गेल्या रविवारी केरळ पोलिसांनी पीएफआयच्या ठिकाणांवर छापे टाकत मोबाईल फोन, लॅपटॉपसहित आक्षेपार्ह सामुग्री जप्त केली होती. इस्लामिक शासन स्थापन करण्यासाठी दहशतवादाच्या मार्गाचा अवलंब करण्याची ‘पीएफआय’चा कट असल्याचे ‘एनआयए’ सूत्रांनी त्यावेळी नमूद केले होते.

मुस्लिम युवकांनी लष्कर ए तोएबा तसेच इसिस सारख्या दहशतवादी संघटनेत सामील व्हावे, याकरिता त्यांची माथी भडकवली जात होती. हिंसक जिहाद अंतर्गत पीएफआयने गेल्या काही काळात देशाच्या विविध भागात दहशतवादी कृृत्ये घडवून आणलेली आहेत. सरकारी धोरणांची चुकीची व्याख्या लोकांसमोर सादर करीत भारताप्रती तिरस्कार व घृणा निर्माण करण्याचा पीएफआयचा प्रयत्न आहे. इतकेच नाही तर धार्मिक समुदायात तेढ निर्माण करणे व मुख्य धारेतील त्यातही विशिष्ठ धर्माच्या नेत्यांची हत्या घडवून आणणे हे पीएफआयचे उद्दिष्ट होते, असे एनआयएचे म्हणणे आहे.

दिल्लीमध्ये काही भागात संचारबंदी….

दरम्यान दिल्लीत मोठा कट रचला जात असल्याच्या गुप्तचरांच्या माहितीनंतर पोलिस व तपास संस्था दक्ष झाल्या आहेत. संवेदनशील मानल्या जाणाऱ्या जामिया नगर येथे संचारबंदीचे कलम 144 लावण्यात आले आहे. दुसरीकडे शाहिनबागमध्ये निमलष्करी सैनिकांना पाचारण करण्यात आले आहे. जामिया विद्यापीठाने एक निवेदन प्रसिध्दीस देऊन विद्यार्थ्यांना कॅंपसमध्ये अथवा बाहेर जमण्यास मनाई केली आहे.

उत्तर प्रदेशात लखनौसह इतर ठिकाणी पीएफआयला मदत करणाऱ्या असंख्य लोकांना अटक करण्यात आली आहे. युपी एटीएस आणि स्पेशल टास्क फोर्सकडून ही कारवाई करण्यात आली. बुलंद शहर येथून एका मौलवीला ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमध्ये दहा लोकांना पकडण्यात आले आहे. सीतापूर येथे पीएफआयच्या दोन सक्रिय लोकांना अटक करण्यात आली आहे. तर कर्नाटकमध्ये देखील पीएफआय वर ताबडतोड कारवाई सुरु असून 25 लोकांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय 40 लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. कोलारमध्ये पोलिसांनी सहा तर बेल्लारीमध्ये चार लोकांना ताब्यात घेतले आहे.

आसाममध्ये गोलपारा, कामरुप, बारपेठा, धुबरी, बगसा, उदलगुरी, करीमगंज, दरांग आदी ठिकाणी कारवाई करण्यात आली. पीएफआयचा जिल्हाध्यक्ष अब्दूल करीम आणि एसडीपीआयचा सचिव शेख मसकसूद याला ताब्यात घेण्यात आले आहे. गुजरातमध्ये एटीएसने अहमदाबाद, सुरत, नवसारी, बनासकांठा येथून 15 लोकांना ताब्यात घेतले आहे. यातील काही लोकांचा विदेशात संपर्क असल्याचे आढळून आले आहे.

काय आहे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ ?

केरळमधील नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट, कर्नाटकमधील फोरम फॉर डिग्‍निटी आणि तामिळनाडूमधील मनिथा नीति पसराई या तीन मुस्‍लिम संघटना एकत्र आल्‍या. या तीन संघटनांनी मिळून १७ फेब्रुवारी २००७ रोजी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेची स्‍थापना केली होती. देशातील २३ राज्‍यांमध्‍ये आमची संघटना सक्रीय असल्‍याचा दावा ‘पीएफआय’ने करत आहे. स्टुडंट्‌स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या संघटनेवर बंदी घातल्‍यानंतर ‘पीएफआय’चा विस्‍तार वेगाने झाला, असे मानले जाते. कनार्टक आणि केरळ राज्‍यांमध्‍ये या संघटनेचा अधिक विस्‍तार आहे. या दोन राज्‍यांमध्‍ये या संघटनेच्‍या अनेक शाखा आहेत. सार्वजनिक निवडणुकीतही ‘पीएफआय’ एकगठ्ठा मताचे , असा आरोप केला जातो. स्‍थापनेपासूनच ही संघटना देशविरोधी कारवायात सहभागी असल्‍याचा आरोप केला जात आहे.

Back to top button