‘पुण्याशी कनेक्टिव्हिटी नसल्याने अर्धवट मार्गावरील मेट्रो बंद ठेवा’ | पुढारी

‘पुण्याशी कनेक्टिव्हिटी नसल्याने अर्धवट मार्गावरील मेट्रो बंद ठेवा’

पिंपरी : दापोडीच्या पुढे संथगतीने काम सुरू असल्याने पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांना पुण्यात मेट्रोने प्रवास करता येत नाही. त्यामुळे जोपर्यंत स्वारगेट, रामवाडी ते वनाजपर्यंत मेट्रो सुरू होत नाही. तोपर्यंत ती मेट्रो बंद ठेवावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

प्रकल्प अर्धवट स्थितीत
काळभोर म्हणाले, की मेट्रो सुरू करण्यापूर्वी केंद्र व राज्य शासनाने नागरिकांना मोठमोठी स्वप्ने दाखविली होती. विविध आश्वासने दिली. मात्र, प्रत्यक्षात वेगळेच चित्र आहे. केंद्र व राज्य शासनाकडून मंजुरी मिळत नसल्याने तसेच, विविध तांत्रिक कारणांमुळे मेट्रो प्रकल्प अर्धवट स्थितीत रखडला आहे.

मेट्रोकडे नागरिकांनी फिरवली पाठ
पुण्यात ये-जा करता येत नसल्याने पिंपरी ते फुगेवाडी या 5.8 किलोमीटर अंतर प्रवास करण्यास नागरिकांनी पाठ फिरविली आहे. प्रतिसाद घटल्याने मेट्रो अक्षरश: रिकामी फिरत आहे. तसेच, मेट्रो स्टेशनला पीएमपीएल बसची कनेक्टीव्हीटी नाही. नागरिकांना आपले वाहन पार्क करण्यासाठी सुरक्षित वाहनतळ नाही. त्यामुळे नागरिकांची फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली आहे.

दुसरीकडे, दापोडीच्या पुढील मार्गिकेचे काम संथ गतीने सुरू आहे. अनेक मेट्रो स्टेशनची कामे अजूनही सुरू आहेत. त्यामुळे जोपर्यंत पिंपरी ते स्वारगेट तसेच, रामवाडी ते वनाजपर्यंत मेट्रो धावत नाहीत, तोपर्यंत अर्धवट मार्गावर सुरू असलेली मेट्रो बंद करावी, अशी मागणी काळभोर यांनी केली आहे.

 

Back to top button