देशविरोधी कृत्य, घोषणा देणार्‍यांवर कठोर कारवाईची मागणी करणार: चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

देशविरोधी कृत्य, घोषणा देणार्‍यांवर कठोर कारवाईची मागणी करणार: चंद्रशेखर बावनकुळे

रांजणगाव गणपती; पुढारी वृत्तसेवा: देशविरोधी कृत्य व घोषणाबाजी करणार्‍यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. रांजणगाव गणपती येथील महागणपती मंदिरामध्ये दर्शनासाठी आले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. या प्रसंगी कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेशराव ताठे, शिरूर-आंबेगाव बेट मंडलाध्यक्ष सतीश पाचंगे, शिरूर तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे, अनिल नवले, काकासाहेब खळदकर, श्रीकांत सातपुते आदींसह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

अडीच वर्षे सत्तेत असताना झोपलेले महाविकास आघाडी सरकार वेदांता व फॉक्सकॉन हे प्रकल्प राज्याबाहेर गेल्यावर जागे झाले आहे. काँग्रेस पक्षाची अवस्था बुडत्या जहाजासारखी झाल्याची टीकाही या वेळी बावनकुळे यांनी केली. बावनकुळे म्हणाले, ’उद्धव ठाकरे हे केवळ नामधारी मुख्यमंत्री होते. सर्व अधिकार राष्ट्रवादीकडे होते. त्यामुळे अडीच वर्षे हे राष्ट्रवादीने सरकार चालवले आहे. उद्धव यांनी सरकारच चालवले नाही.

काँग्रेस पार्टी आता बुडते जहाज आहे आणि त्यामुळे त्या जहाजात कुणी बसेल, त्याचा काही फायदा नाही. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाले. आठ वर्षांत जगातील 155 देशांमध्ये भारताची उंची वाढल्याचे ते म्हणाले. भाजपमध्ये भरपूर जण जवळीक साधत आहेत. एखाद्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसेल. राष्ट्रवादी काँग्रेस हा नेत्यांचा पक्ष आहे, तर भाजप हा जनतेचा पक्ष असल्याचे देखील बावनकुळे यांनी सांगितले. दरम्यान, प्रथम चंद्रशेखर बावनकुळे यांनी महागणपतीचे दर्शन घेतले. या वेळी त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

Back to top button