41 ग्रामपंचायतींचा आज फैसला, अकोले तालुक्यात भरपावसात दुपारपर्यंत 61 टक्के मतदान | पुढारी

41 ग्रामपंचायतींचा आज फैसला, अकोले तालुक्यात भरपावसात दुपारपर्यंत 61 टक्के मतदान

अकोले : पुढारी वृत्तसेवा : अकोले तालुक्यातील 41 ग्रामपंचायतींसाठी रविवारी (दि.18) दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 61.27 टक्के मतदान झाले आहे. पावसामुळे मतदारांना मतदान केंद्र गाठणे अवघड झाले होते. सोमवारी तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. आगमी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री मधुकर पिचड व भाजपचे माजी आमदार वैभव पिचड आणि राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांच्या गटात चुरशीची लढाई पाहावयास मिळाली. अकोले तालुक्यातील मुदत संपणार्‍या 45 ग्रामपंचायतींसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.

खुटेवाडी, जामगाव व शेलद या तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. सारकुटे ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही. मात्र, सरपंच पदासाठी एकच अर्ज दाखल झाला. त्यामुळे सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली.  त्यामुळे रविवारी (दि.18) तालुक्यातील 41 ग्रामपंचायतींच्या 174 जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीसाठी एकूण मतदारसंख्या 63 हजार 602 इतकी आहे. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 38 हजार 969 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. थेट सरपंचपदासाठी मतदान होणार असल्यामुळे या निवडणुकीत चुरस वाढली होती.

यामध्ये राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या राजूर ग्रामपंचायत निवडणुकीत सुमारे 66 टक्के मतदान झाले. मात्र, सरपंचपद महिला राखीव असल्याने राजूर गावचा कारभार कुणाच्या हाती जाणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहेत. मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने त्याचा फटका मतदानावर झाला असला तरीही राजकीय पक्षांनी मतदारांना घरातून बाहेर काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मतदानाच्या वेळी राजूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली 42 निवडणूक केंद्रावर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे सर्व केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. अकोले तहसील कार्यालयात सोमवारी (दि.19) सकाळी 10 वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार आहे.

या ग्रामपंचायतींसाठी झाले मतदान
आबितखिड, बाभूळवंडी, चिचोंडी, चिंचावणे, धामणवन, गोंदुशी, करंडी, कातळापूर, केळी कोतूळ, केळी ओतूर, केळी रुम्हणवाडी, केळुगण, खिरविरे, कोहडी, कोदनी, लव्हाळी ओतूर, माळेगाव, मान्हेरे, मवेशी, म्हाळुगी, मुथाळणे, पाडाळणे, पाडोशी, पळसुंदे, पांजरे, पिंपरकणे, राजूर, रणदखुर्द बुद्रुक, समशेरपूर, सांगवी, सातेवाडी, सावरगाव पाट, सावरकुटे, शेणीत, शिरपुंजे बुद्रुक, टाहाकरी, तळे, तेरुंगण, टिटवी, उडदावणे, विठे व वारंघुशी.

Back to top button