काष्टी : कर्ज थकबाकीमुळे सहा संचालक अपात्र | पुढारी

काष्टी : कर्ज थकबाकीमुळे सहा संचालक अपात्र

काष्टी : पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील दत्त विविध कार्यकारी सेवा संस्थेचे संचालक प्रशांत नारायणराव चौधरी, सागर प्रशांत चौधरी, जयदीप दिलीप चौधरी, स्मिता प्रशांत चौधरी, रामदास बापुराव गवते व लक्ष्मण शंकरराव पिंपळे हे सहा संचालक कर्ज थकबाकीमुळे अपात्र झाले आहेत. त्यांना श्रीगोंदा येथील सहाय्यक निबंधक अभिमान थोरात यांनी अपात्रतेची नोटीस दिली आहे. त्यामुळे काष्टीतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या सेवा संस्थेची काही दिवसांपूर्वी संस्थेचे अध्यक्ष विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक झाली. यामध्ये त्यांचा संपूर्ण पॅनल विजयी झाला. त्यावेळी विरोधक सुभाष कोंडीबा चौधरी यांनी सहकार पणन व वस्रोद्योग विभाग, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्रीगोंदा यांच्याकडे 20 जुलै 2022 रोजी संस्थेच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. यामध्ये संस्थेचे संचालक प्रशांत चौधरी यांच्याकडे 3 लाख 60 हजार रुपये, सागर चौधरी यांच्याकडे 2 लाख 52 हजार 500 रुपये, जयदीप चौधरी 1 लाख 50 हजार रुपये, स्मिता चौधरी 2 लाख 40 हजार रुपये, रामदास गवते 1 लाख 58 हजार 930 रुपये व लक्ष्मण शंकर पिंपळे दत्त संस्थेचे संचालक असून, त्यांच्याकडे कल्पतरु ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची 12 लाख 1 हजार 550 रुपये कर्ज थकबाकी आहे. कर्ज थकबाकी असल्याने परवानगी नसताना त्यांनी दत्त संस्थेची निवडणूक लढविली. त्यामुळे तक्रारदार सुभाष चौधरी यांनी सहाय्यक निबंधक यांच्याकडे दत्त सेवा संस्थेच्या या सहा संचालकांचे पद रद्द करण्याची मागणी केली होती.

त्यावर सुनावणी घेऊन सहाय्यक निबंधक अभिमान थोरात यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 क.अ.मधील तरतुदीनुसार या सहा जणांना संचालक पदासाठी अपात्र झाल्याचे घोषित केले आहे. अशा आदेशाची नोटीस दत्त संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांना दि.12 व 13 सप्टेंबर रोजी पारित केली आहे. संस्थेत एकूण तेरा संचालक असताना आता सहा संचालक अपात्र झाल्याने संस्थेवर प्रशासक नेमून लवकरच संस्थेची पुन्हा निवडणूक लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Back to top button