Monsoon Update | मान्सून माघारीचा प्रवास लांबला, पुढील दोन आठवड्यांपर्यंत सक्रिय राहण्याची शक्यता | पुढारी

Monsoon Update | मान्सून माघारीचा प्रवास लांबला, पुढील दोन आठवड्यांपर्यंत सक्रिय राहण्याची शक्यता

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून मान्सून (Monsoon Update) सक्रिय आहे. दरम्यान, येत्या दोन आठवड्यांपर्यंत वायव्य भारतातून (northwest India) मान्सून माघारी फिरण्याची शक्यता नसल्याचे संकेत भारतीय हवामान विभागाने दिले आहेत. वायव्य भारतातून मान्सूनचा माघारीचा प्रवास सुरू होण्याची सामान्य तारीख १७ सप्टेंबर आहे. पण मान्सून अद्याप सक्रिय असल्याने त्याच्या माघारीची तारीख पुढे गेली आहे.

याआधी हवामान विभागाने मान्सूनचा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच परतीचा प्रवास सुरू होईल असा अंदाज वर्तवला होता. पण अंदाज चुकला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट भागात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे आहे. तसेच उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच २० सप्टेंबरपासून ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील काही भागांत मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि थोडाफार कोल्हापूर, कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी या भागासह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत २० सप्टेंबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे.

२० सप्टेंबरपर्यंत विदर्भात विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस बरसणार आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा या भागात आगामी दोन दिवस घाटमाथ्यावर मुसळधार, कोकणातील पालघर, रायगड या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पुढील दोन दिवस बरसणार आहे.

यावर्षी केरळमध्ये मान्सूनचे वेळेतच आगमन झाले होते. त्यानंतर पुढील प्रवास अनुकूल वातावरणामुळे जोरदार झाला आणि वेळेतच संपूर्ण देश व्यापला. बंगालच्या उपसागरात जून महिन्यात पाऊस पडण्यासाठी पाहिजे, त्या प्रमाणात कमी दाबाचे पट्टे तयार झाले नाहीत. त्यामुळे या महिन्यात पाऊस बरसलाच नाही. त्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे वाढले. त्यामुळे सलग मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली. परिणामी जून महिन्यामधील पावसाची सरासरी अगदी काही दिवसांतच जुलै महिन्यात भरून निघाली. (Monsoon Update)

 हे ही वाचा :

Back to top button