

पुढारी डेस्क : राज्यात पुढील ३, ४ दिवस आणि त्यापुढील दिवसात मान्सून (Maharashtra Weather Forecast) सक्रिय राहणार आहे. काही जिल्ह्यांत मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर याचा वाढता परिणाम होऊ शकतो, असे हवामान विभागाने म्हटले आहे. राज्यातील किनारपट्टीलगत द्रोणीय पट्टा तयार झाला आहे. यामुळे कोकण, गोवा किनारपट्टीवर आज (दि.१४) सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तसेच बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागांत १७ सप्टेंबर पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
मध्य महाराष्ट्रातही बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा, विदर्भात देखील पुढील चार दिवस पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने आज बुधवारी (दि.१४) ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तर १५ सप्टेंबर रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, नाशिक, नंदूरबार जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट दिला आहे.
मुंबई ठाणे येथील काही भागांत गेल्या २४ तासांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. मुंबई ठाण्यात पुढील काही तासांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पावसाची शक्यता आहे. काल मंगळवारी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. कोकण, गोवा आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडला असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. (Maharashtra Weather Forecast)