कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुरगूड नगरपालिकेला २५ कोटींचा निधी : आमदार हसन मुश्रीफ | पुढारी

कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुरगूड नगरपालिकेला २५ कोटींचा निधी : आमदार हसन मुश्रीफ

मुदाळ तिट्टा; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुरगूड नगरपालिकेला विकास कामांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी दिला. त्यामुळे चांगली विकास कामे झाली आहेत. नगरपालिकेच्या आगामी निवडणुका ह्या ओबीसी आरक्षणामुळे खोळंबून राहिल्या आहेत. दिवाळीनंतर नगरपालिका निवडणुका ओबीसी आरक्षणासह होतील, असा विश्वास व्यक्त करत मुरगूडच्या विकास कामांसाठी यापुढेही सहकार्य करण्याचे अश्वासन आमदार हसन मुश्रीफ यांनी दिले. मुरगूड नगरपालिकेच्या १०१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार निधीतून मुरगूड नगरपालिकेला देण्यात आलेल्या घंटा गाड्यांचे लोकार्पण करण्यात आले.

मुरगूड नगरपालिकेच्या १०१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून यावेळी शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा व स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्म्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान यावेळी करण्यात आला. यावेळी आमदार मुश्रीफ म्हणाले की, मुरगूड नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नगरपालिकेला १०१ वर्ष पूर्ण झाले बद्दल आयोजित केलेला कार्यक्रम हा माणसांच्या हृदयाचा ठाव घेणारा आहे. ज्या ठिकाणी आपण नोकरी करतो तेथे आपण काहीतरी देणे लागतो, असे मनाशी धरून नगरपालिकेवर प्रशासक असतानाही स्वखर्चातून त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. ही गोष्ट माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विचार करायला लावणारी ठरले. कर्मचारी वर्गाकडून गेले अनेक दिवस आयोजित केलेले हे कार्यक्रम राजकीय कार्यकर्त्यांच्या डोळ्यांमध्ये अंजन घालणारे असे ठरले. याबद्दल या कर्मचारी वर्गाला धन्यवाद देतो, असे मुश्रीफ म्हणाले.

यावेळी बोलताना कोल्हापूर जिल्हा भाजपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले की, शिंदे-फडणवीस सरकारकडे नगरपालिकेचे काय काम असेल तर तो विषय घेऊन या, आपण त्याचा पाठपुरावा करू. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात चांगले काम केले, प्रचंड कष्ट घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. मुरगूडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील म्हणाले, मुरगूड शहरात गेल्या अनेक वर्षांपासून अंबाबाईच्या मंदिराचे बांधकाम सुरू आहे. आमदार मुश्रीफ यांच्या प्रयत्नातूनच ते मंदिर आता पूर्णत्वाकडे जात आहे. येत्या डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये या मंदिराचा वास्तुशांती समारंभ नियोजित आहे. त्यावेळी आमदार मुश्रीफ यांचा सपत्नीक सत्कार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी या मंदिरासाठी पाच कोटींचा निधी दिल्यामुळेच मंदिर पूर्ण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास डी. डी. चौगले, विकास पाटील, रणजीत सूर्यवंशी, विलास गुरव, दत्तामामा खराडे, दिगंबर परीट, राहुल वडंकर, दगडू शेणवी, सुधीर सावर्डेकर, राजू आमते, दिग्विजय पाटील, जयवंत गोधडे, प्रकाश पोतदार, सुनील पाटील, शामराव घाटगे, एम.डी. रावण, मुख्याधिकारी अजिंक्य पाटील, साताप्पा पाटील (बेलेवाडी), वसंत रेडेकर (आणुर), भगतसिंग एकल (चिमगाव), संतोष पाटील (बस्तवडे), मल्लापा चौगले, हरिबा बेनाडे (चिखली), शंकरावजी इंगवले, स्वामी कापशी यांचे नातेवाईक उपस्थीत होते. स्वागत व प्रास्तावित अमर पाटील व अमर कांबळे यांनी तर आभार रणजित निंबाळकर यांनी मानले.

हेही वाचा :

Back to top button