पुणे : 6 हजार 737 विद्यार्थ्यांना दुसर्‍या विशेष फेरीत प्रवेश | पुढारी

पुणे : 6 हजार 737 विद्यार्थ्यांना दुसर्‍या विशेष फेरीत प्रवेश

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेच्या दुसर्‍या विशेष फेरीत 6 हजार 737 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला असून, 4 हजार 285 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले.

केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश समितीतर्फे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यंदा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 1 लाख 10 हजार 990 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी 93 हजार 960 जागा केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे भरल्या जाणार आहेत. प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत तीन नियमित फेर्‍या आणि एका विशेष फेरीद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले.

तर अद्याप प्रवेश न घेतलेले विद्यार्थी, पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थी आणि एटीकेटी सवलत प्राप्त विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळण्यासाठी दुसरी विशेष फेरी राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. दुसर्‍या विशेष फेरीची गुणवत्ता यादी आणि महाविद्यालय प्रवेश गुरुवारी जाहीर करण्यात आले.

दुसर्‍या विशेष फेरीत 9 हजार 415 विद्यार्थी सहभागी झाले. त्यातील 6 हजार 737 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला, तर 2 हजार 678 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला नाही. प्रवेश जाहीर झालेल्यांपैकी 4 हजार 285 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे, 1 हजार 134 विद्यार्थ्यांना दुसर्‍या पसंतीचे, 504 विद्यार्थ्यांना तिसर्‍या पसंतीचे महाविद्यालय मिळाले

Back to top button