कायद्यात सुधारणा करण्याच्या नावाखाली कामगारांचे हक्क कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील | पुढारी

कायद्यात सुधारणा करण्याच्या नावाखाली कामगारांचे हक्क कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : देश पातळीवर कामगारांविषयी जे धोरण आखले जात आहे, त्या धोरणांनुसार कामगारांचे संरक्षण कसे टिकवायचे? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. कामगार कायद्यात सुधारणा करण्याच्या नावावर जो बदल केला जात आहे, तो कामगारांचे हक्क कमी करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे कामगारांचे नुकसान होणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्यावतीने किल्ले पन्हाळा येथे कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्‍यात ते बाेलत हाेते.

यावेळी जयंत पाटील म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात फार विचारपूर्वक काही तरतुदी केल्या होत्या, ज्यामुळे कामगार वर्गाला मोठ्या सवलती होत्या. मात्र ही व्यवस्था मोडीत काढण्याचे काम सध्या केले जात आहे. त्यांचे हक्क मर्यादित केले जात आहेत. सरकारने शेतकऱ्यांविरोधात तीन कृषी कायदे आणले होते; पण शेतकऱ्यांनी याविरोधात मोठे आंदोलन उभारल्याने राज्यकर्त्यांना झुकावे लागले. कामगारांच्या हितासाठीही देशव्यापी आंदोलन पुकारले पाहिजे. तेव्हाच कष्टकरी बांधवांचे हक्क आपल्याला राखता येतील, असे त्यांनी म्हटले आहे.

कंत्राटी कामगारांचे प्रमाण जास्त झाले आहे. कंत्राटी कामगारांना कोणताही न्याय दिला जात नाही. खासगी कारखान्यांचे प्रमाण वाढले आहे. कामगारांकडून कमी पगारात जास्त तास काम करून घेतले जात आहे. कामगार चळवळीने याकडे लक्ष द्यायला हवे, असे आवाहन जयंत पाटील यांनी यावेळी केले.

शरद पवार यांनी साखर कारखाना चळवळीची जपणूक केली

साखर कारखाना चळवळीशी ४० वर्षांपेक्षा जास्त संबंध आहे, अनेक जुन्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली काम केले आहे. शरद पवार यांनी चळवळीची नेहमीच जपणूक केली. ही चळवळ टिकावी म्हणून अनेक धोरणे आणली. त्यांनी कष्टकरी बांधव समाधानी राहील याची खबरदारी घेतली. मात्र या चळवळीला धक्का लावण्याचे काम सध्या होत आहे. ही चळवळ स्वाभिमानातून उभी राहिली पाहिजे, चांगले नेते तयार झाले पाहिजेत, त्या नेतृत्वाच्या माध्यमातून कामगारांच्या पदरात जास्तीचा न्याय पडला पाहिजे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात गुंतवणूक कशी वाढेल यावर राज्यकर्त्यांनी भर द्यायला हवा

देशात सर्वात जास्त औद्योगिकीकरण महाराष्ट्रात आहे. देशाची प्रगती करायची असेल तर महाराष्ट्रात आर्थिक गुंतवणूक वाढली पाहिजे अशी जागतिक पातळीवरील मंडळींचे मत आहे. महाराष्ट्रात जर कारखाने आणि इतर गोष्टी आल्या तर इतर राज्य प्रेरीत होतील. आपल्या महाराष्ट्रात गुंतवणूक कशी वाढेल या गोष्टीकडे आपल्या राज्यकर्त्यांनी भर द्यायला हवा. विविध कारणांनी अनेक कर्मचाऱ्यांना आयुष्यात आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. यावरही आपल्याला लक्ष दिले पाहिजे. संकटाच्या काळात कामगार बांधवाला मदत होईल, अशी व्यवस्था निर्माण करायला हवी. कष्टकरी वर्गाला याने मोठा दिलासा मिळेल, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button