इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंच असद रौफ (Former Pakistani umpire Asad Rauf) यांचे गुरुवारी (दि, १५) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पंजाबमध्ये जन्मलेले असद रौफ हे ६६ वर्षाचे होते. रौफ यांचे भाऊ ताहीर यांनी सांगितले की, लाहोरमधील लांडा बाजार येथील कपड्याचे दुकान बंद करून असद रौफ घरी परतत होते. यादरम्यान त्यांना छातीत दुखण्याचा त्रास जाणवला. रौफ यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. पण त्यांनी तेथे अखेरचा श्वास घेतला.
रौफ हे पाकिस्तानमधील दिग्गज पंचांपैकी एक होते. २००६ मध्ये रौफ यांना आयसीसी पंचांच्या एलिट पॅनेलमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी ४७ कसोटी, ९८ एकदिवसीय आणि २३ टी-20 सामन्यांत पंच म्हणून काम पाहिले. त्यांनी मुख्य पंच म्हणून तब्बल ७ वर्षे काम पाहिले. वार्षिक कामगिरीच्या आढाव्यानंतर २०१३ मध्ये त्यांना पंचांच्या एलिट पॅनेलमधून वगळण्यात आले.
रौफ यांनी १९९८ मध्ये अंपायरिंग क्षेत्रात प्रवास सुरू केला. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात २००० मध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. चार वर्षांनंतर २००४ मध्ये रौफ यांचा प्रथमच आंतरराष्ट्रीय पंचांच्या पॅनेलमध्ये समावेश करण्यात आला होता.
पाकिस्तानी खेळाडूंवर आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घातली तरी असद यांचे अंपायरिंग सुरुच होते. पण आयपीएल २०१३ च्या स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात त्याचे नाव समोर आल्यानंतर रौफ यांच्या कारकीर्द उतरणीला लागली. एक कार्यक्षम पंच असण्यासोबतच रौफ हे पाकिस्तानमधील प्रथम श्रेणीमधील प्रसिद्ध क्रिकेटपटूदेखील होते. त्यांनी ७१ प्रथम श्रेणी आणि ४० लिस्ट ए सामन्यांमध्ये तीन शतके आणि २६ अर्धशतकांच्या मदतीने अनुक्रमे ३.४२३ आणि ६११ धावा केल्या आहेत. रौफ आपल्या क्रिकेट कारकिर्दीत लाहोर, नॅशनल बँक ऑफ पाकिस्तान, पाकिस्तान रेल्वे आणि पाकिस्तान विद्यापीठांकडून क्रिकेट खेळले आहेत.
मुंबईतील एका मॉडेलने २०१२ मध्ये असद रौफ (Asad Rauf) यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. मॉडेलचे म्हणणे होते की असद रौफ आणि माझे एकमेकांवर प्रेम आहे. लग्नाचे आश्वासन देऊन रौफ यांनी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप मॉडेलने केला आहे. दरम्यान, रौफ यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते.
हे ही वाचा :