जांबूत येथे पिंजर्‍यात बिबट्या जेरबंद | पुढारी

जांबूत येथे पिंजर्‍यात बिबट्या जेरबंद

पिंपरखेड; पुढारी वृत्तसेवा: शिरूर तालुक्यातील जांबूत येथे वनविभागाने लावलेल्या पिंजर्‍यात अखेर बिबट्या जेरबंद झाला. 15 दिवसांपासून हुलकावणी देणार्‍या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. असे असले तरी या परिसरात बिबट्याची संख्या मोठी असल्याने वनविभागाने इतर बिबट्यांचाही बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

जांबूत येथे 15 दिवसांपूर्वी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तरूणाचा मृत्यू झाला होता. नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्याचे मोठे आव्हान वनविभागाच्या कर्मचार्‍यांसमोर उभे टाकले होते. या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागानेही कंबर कसत कळमजाई परिसरात तीन पिंजरे लावले होते. 15 दिवस हुलकावणी देणारा बिबट्या मंगळवारी (दि. 13) रात्री पिंजर्‍यात अडकला.
या घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाचे कर्मचारी महेंद्र दाते यांनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी स्थानिक नागरिकांनी गर्दी केली होती. प्रसंगावधान राखत महेंद्र दाते यांनी पिंजर्‍यात अडकलेल्या बिबट्याला माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात दाखल केले.

पिंजर्‍यात अडकलेला बिबट हा 4 ते 5 वर्षे वयाचा नर असून, तो नरभक्षक नसून शांत आहे. त्याला माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात दाखल करण्यात आले आहे. वडनेर, पिंपरखेड, जांबूत या ठिकाणी अजून, सहा पिंजरे लावलेले आहेत.
                                                                            – मनोहर म्हसेकर,
                                                                       वनपरिक्षेत्र अधिकारी, शिरूर

Back to top button