सांगली : साधूंना मारहाण प्रकरणी २२ जणांवर गुन्हा दाखल | पुढारी

सांगली : साधूंना मारहाण प्रकरणी २२ जणांवर गुन्हा दाखल

जत, पुढारी वृत्तसेवा : पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या देवदर्शनासाठी जाणाऱ्या चार साधूंना जत तालुक्यातील लवंगा येथे ग्रामस्थांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. चार चाकी गाडीतून ओढून रस्त्यावर लाथाबुक्याने कातडी पट्ट्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची दखल पोलीस महासंचालकानी घेतली असून पोलीस यंत्रणा खडबडून जागा झाली आहे. याप्रकरणी २२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, ९ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मारहाण झालेले चारही साधू उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील मथुरेतील पंच दर्शन जुना आखाड्यातील आहेत. ते कायम विविध धार्मिक स्थळी भेट देतात. नेहमीप्रमाणे त्यांनी कर्नाटकातील काही धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. त्यानंतर मंगळवारी वारकरी संप्रदायातील मुख्य ठिकाण पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जात होते. दरम्यान ते लवंगा (ता.जत) येथे चार चाकी गाडीतून आले. यावेळी पंढरपूरकडे जाण्याचा रस्ता एका विद्यार्थ्याला विचारला. अन् गावात पोरे चोरणारी टोळी आल्याची अफवा पसरली आणि त्यात चारही साधूंना जमावाच्या रोषास सामोरे जावे लागले. सुरुवातीस शिव्याची लखोली वाहली. यावेळी साधुनी आम्ही वारकरी संप्रदायातील आहोत. परंतु जमावाला दया आली नाही. उलट गाडीतून साधूना रस्त्यावर ओढले व फरफटत मारहाण केली याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर साधूंवर उपचार करण्यात येत आहेत. संबंधितावर तक्रार देण्याबाबत विचारणा करण्यात आली. मात्र साधूंनी साफ नकार देत तक्रार दिली नाही. मात्र पंढरपूर येथील देवदर्शनासाठी न जाता मूळ गावी परतले. या घटनेनंतर राज्यातील विविध मंत्री महोदय, विविध संघटना, राजकीय, सामाजिक पातळीतून नाराजी व्यक्त करत निषेध ही केला आहे. पोलीस महासंचालकानी दिलेल्या चौकशीच्या आदेशानंतर पोलीस अधीक्षक यांच्यासह मोठी टीम बुधवारी रात्री आठ वाजेपर्यंत घटनास्थळी होती. यातील संशयित आरोपी म्हणून नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

हेही वाचलतं का?

Back to top button