National Cinema Day : खुशखबर! ‘या’ दिवशी मिळणार ७५ रूपयात सिनेमाचे तिकीट | पुढारी

National Cinema Day : खुशखबर! 'या' दिवशी मिळणार ७५ रूपयात सिनेमाचे तिकीट

पुढारी ऑनलाईन डेस्क : मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाकडून राष्ट्रीय सिनेमा दिन (National Cinema Day) साजरा करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या दिनाचे औचित्य साधून देशभरातील सर्व सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांकडून फक्त ७५ रूपयांचे तिकीट घेऊन सिनेमा दाखवला जाणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हा दिवस साजरा केला जाणार आहे. चित्रपट पाहणाऱ्यांसाठी ही मोठी खुशखबर आहे.

पीव्हीआर, आयनॅाक्स, कार्निवल, सिनेपॅालिस, मिराज, सिटीप्राईड, एशियन मुक्ता ए२, वेव, मूवीटाईम, एम२के, डिलाईट यासारख्या महागड्या आणि अन्य सर्व सिनेमागृहांमध्ये हा उपक्रम दाखवला जाणार आहे. केवळ ७५ रूपये शुल्क आकारून चित्रपट दाखवणे ही प्रेक्षकांकरिता मोठी मेजवानी असणार आहे. त्यामुळे या राष्ट्रीय सिनेमा दिनी सर्व सिनेमागृहे हाऊसफुल्ल असणार हे निश्चित आहे.

राष्ट्रीय सिनेमा दिन हा दिवस १६ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार होता. पण हा निर्णय आता बदलण्यात आल्याचे मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाकडून सांगण्यात आले आहे. १६ सप्टेंबर ही तारीख बदलून आता २३ सप्टेंबर रोजी हा राष्ट्रीय सिनेमा दिन साजरा केला जाणार आहे. त्यामुळे चित्रपट चाहत्यांनी याची नोंद घ्यावी, की २३ सप्टेंबर रोजी देशभरामध्ये सिनेमागृहांमध्ये ७५ रूपयांमध्ये सिनेमा दाखवला जाईल.

राष्ट्रीय सिनेमा दिनाची ठरवलेली तारीख बदलण्याचे कारण काय?

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचा ब्रम्हास्त्र हा सिनेमा या तारीख बदलामागचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. ब्रम्हास्त्र हा सिनेमा सध्या बॅाक्स ऑफीसवर चांगली कमाई करत आहे. याआधी आलेल्या लाल सिंग चड्डा यासारख्या आणखी काही सिनेमांना चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. ही परिस्थिती फक्त बॅालिवूडवरच नाही तर भारतातील सर्व भाषांमध्ये बनवल्या जाणाऱ्या चित्रपट निर्मिती संस्थांमध्ये हीच परिस्थिती आहे. त्यामुळे देशातील सर्व चित्रपटनिर्माते, सिनेमागृहे यांच्यावर आर्थिक संकट उभे राहीले. त्यामुळेच ही तारीख बदलण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा

Back to top button