उद्योजकांचे खच्चीकरण करणाऱ्या बँकांवर होणार कायदेशीर कारवाई : मंत्री उदय सामंत | पुढारी

उद्योजकांचे खच्चीकरण करणाऱ्या बँकांवर होणार कायदेशीर कारवाई : मंत्री उदय सामंत

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : सर्व कागदपत्राची पूर्तता केलेल्या युवा उद्योजकाचे जर बँक कर्ज देण्यावरून वारंवार खच्चीकरण करत असेल तर अशा उद्योजकांच्या पाठीशी शिंदे-फडणवीस सरकार खंभीरपणे उभे आहे. शिवाय अशा बँकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे. ते डोंबिवलीत एका कार्यक्रमात बोलत होते.

गेल्या अडीच वर्षात किती प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले याची मी उद्या यादीच जाहीर करतो असे देखील त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. उद्योजकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी उद्योजकांची एक समिती स्थापन केली जाईल व लवकरच त्यावर निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्रातील उद्योजकांना कुठलाही त्रास होणार नाही, हा संकल्प करत असल्याचे सांगत उद्योग खात्यातील अधिकाऱ्यांनी आपली जबाबदरी समजून काम केले पाहिजे, अशा सूचनाही उदय सामंत यांनी यावेळी दिल्या आहेत.

कामगार किंवा उद्योजकांच्या असोसिएशनचे प्रश्न मंत्रालयाच्या केबिनमध्ये बसून सोडवण्यापेक्षा प्रत्यक्षात असोसिएशनच्या कार्यालयात बसून सोडवणे महत्त्वाचे आहे. मंत्री त्यांच्या घरातला आहे अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. या उद्देशाने मी आज कामा संघटनेला भेट दिली. मात्र कामा संघटनेला त्यांच्या कार्यालयात येऊन भेट देणारा पहिला उद्योग मंत्री ठरलो असल्याचे सामंत म्हणाले. यावेळी कामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी, कमल कपूर, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन उपस्थित होते.

हेही वाचलतं का?

Back to top button