अभिमानास्पद! ३० वर्षापूर्वी सोडला होता अभ्यास, आता ५२ व्या वर्षी क्रॅक केली NEET परीक्षा | पुढारी

अभिमानास्पद! ३० वर्षापूर्वी सोडला होता अभ्यास, आता ५२ व्या वर्षी क्रॅक केली NEET परीक्षा

अहमदाबाद : त्यांचे तीन दशकापूर्वी एक अपुरे राहिलेले स्वप्न आता त्यांनी वयाच्या ५२ व्या वर्षी पूर्ण केले आहे. यामागे सामाजिक हित हेही एक कारण होते. ही गोष्ट आहे अहमदाबाद येथील प्रदीप कुमार सिंह यांची. त्यांनी वयाच्या ५२ व्या वर्षी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट म्हणजे NEET परीक्षा क्रॅक केली आहे. बुधवारी रात्री नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यांनी या परीक्षेत ७२० पैकी ६०७ गुण मिळवले आहेत. प्रदीप कुमार सिंह हे पेशाने व्यावसायिक आहेत.

सुमारे तीन दशकांपूर्वी त्यांनी नियमित अभ्यास सोडला होता. पण आता वयाच्या ५२ व्या वर्षी त्यांनी नीट परीक्षेत यश मिळवले आहे. त्यांना आता डॉक्टर व्हायचे नसले तरी त्यांची इच्छा आता गरीब विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग देण्याची आहे जेणेकरून ते NEET क्रॅक करू शकतील आणि पुढे डॉक्टर बनू शकतील.

“नीट परीक्षेतील यशानंतर माझा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्याचा कोणताही हेतू नाही. पण मला आता गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत NEET कोचिंग सेंटर सुरू करायचे आहे,” असे सिंह यांनी म्हटले आहे. त्यांचा मुलगा मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या तृतीय वर्षात शिकत आहे. नीट परीक्षा देण्यासाठी त्यांना त्यांच्या मुलाचा संपूर्ण पूर्ण पाठिंबा होता.

सिंह यांनी १९८७ मध्ये दिल्ली येथे झालेल्या १२वीच्या विज्ञान परीक्षेत ७१ टक्के गुण मिळवले होते. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून कला (अर्थशास्त्र) शाखेतून पदवी प्राप्त केली आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून व्यवसाय अर्थशास्त्रातून (Business Economics) पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. “आपण सुरुवातीच्या काळात विविध बिझनेस जर्नल्ससाठी काम केले. नंतर, मी व्यवसायाकडे वळलो,” असे सिंह सांगतात.

२०१९ मध्ये त्यांचा मुलगा बिजिन स्नेहंशने NEET परीक्षा दिली आणि त्याला ५९५ गुण मिळाले. याबाबत बोलताना ते म्हणाले की, जेव्हा माझा मुलगा NEET ची तयारी करू लागला, तेव्हा मी त्याला प्रोत्साहन दिले. त्यावेळी मला जाणीव झाली की कोचिंग संस्था भरमसाठ फी आकारतात आणि ही फी गरीब विद्यार्थ्यांना परवडणारी नाही.

प्रदीप कुमार सिंह आणि त्यांच्या मुलाने यावर चर्चा केली. “माझा मुलगा जीवशास्त्रात हुषार आहे तर माझे भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र चांगले आहे. आम्ही हे विषय मोफत शिकवायचे ठरवले. सध्या आम्ही आमच्या घरी काही विद्यार्थ्यांना शिकवतो, ज्यांचे पालक मनरेगा कामगार म्हणून काम करतात. पण विश्वास कोण ठेवणार नाही. स्वतः परीक्षा न देता इतरांना कसे शिकवणार? असा प्रश्न मनात होता.”

२०२१ मध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सी आणि नॅशनल मेडिकल कौन्सिलने NEET साठी उच्च वयोमर्यादा काढून टाकण्याचा निर्णय घेतला. यानंतर मी अगदी कमी वेळेत NEET साठी तयारी केली. जुलैच्या परीक्षेसाठी मी फेब्रुवारीमध्ये अभ्यासाला सुरुवात केली. मी खूप अभ्यास करून ९८.९८ टक्के गुण मिळवले. आता माझ्याकडे आणि माझ्या मुलाकडे कोचिंगसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आम्ही आत्मविश्वास निर्माण करू शकतो,” असे त्यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा :

Back to top button