सांगली : आटपाडी जबरी चोरीतील दोन आरोपींना अटक, एकाचा कुडाळ दरोड्यात सहभाग | पुढारी

सांगली : आटपाडी जबरी चोरीतील दोन आरोपींना अटक, एकाचा कुडाळ दरोड्यात सहभाग

आटपाडी, पुढारी वृत्तसेवा : आटपाडी पोलीसांनी जबरी चोरी प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली. त्यापैकी एक जण जून महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मधील ४० लाखांचा दरोड्यात सहभागी होता. स्वप्निल दगडु हजारे (वय २०) आणि प्रथमेश मुकुंद शिंदे ( १९, दोघेही रा. लेंगरे ता. खानापूर जि. सांगली) अशी त्यांची नांवे आहेत. या दोन आरोपींकडून दोन मोटरसायकल आणि ५४ ग्रॅम सोने असा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम आणि पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी दिली.

आटपाडी पोलीस ठाण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. निरीक्षक मेमाणे यांना खास बातमीदाराकडून बसस्थानक परिसरात विना नंबरप्लेटच्या मोटरसायकल वरून दोघेजण संशयित रित्या फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलीसांनी तत्काळ  दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. पोलीस तपासात उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर या दोघांनी २० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजता दिघंची ते खवासपूर रस्त्यावर चालत जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्यांचे मंगळसूत्र हिसका देऊन काढून घेत मोटरसायकल वरून पलायन केले. तसेच २० मार्च रोजी सकाळी ८.४५ वाजता घरनिंकी येथील ओढ्यात ७० वर्षाच्या वृद्धाला थांबवून त्याच्या मोटारसायकलची किल्ली घेऊन त्याच्या गळ्यातील चार तोळ्यांची चेन हिसका मारून घेत मोटरसायकल वरून पळ काढल्याची कबुली दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळला ५ जून रोजी पाच जणांनी दरोडा टाकला आणि ४० लाखांची रोकड लंपास केली. दरोड्यातील तीन आरोपी सापडले असून दोन फरारी होते. प्रथमेश शिंदे हा देखील या दरोड्यात सहभागी होता. पोलीस निरीक्षक मेमाणे,उपनिरीक्षक अजित पाटील, हेड कॉन्स्टेबल शैलेश कोरवी, पाटील, पोलीस नाईक अमोल कराळे, नितीन मोरे, कॉन्स्टेबल संभाजी सोनवणे, ढाले,लोंढे यांनी ही कारवाई केली. आज दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली.

हेही वाचलंत का?

Back to top button