मुला-मुलींनी वर्गात एकत्र बसणे भारतीय संस्कृतीच्या विरुद्ध : केरळमधील नेत्याचे वादग्रस्त विधान | पुढारी

मुला-मुलींनी वर्गात एकत्र बसणे भारतीय संस्कृतीच्या विरुद्ध : केरळमधील नेत्याचे वादग्रस्त विधान

पुढारी ऑनलाईन डेस्क : kerala leader vellappally natesan : मुली आणि मुलांनी वर्गात एकत्र बसणे भारतीय संस्कृतीच्या विरुद्ध आहे, असे वादग्रस्त विधान केरळमधील नेते वेल्लापल्ली नटेसन यांनी केले आहे. केरळमधील डाव्या लोकशाही आघाडीच्या (LDF) नेतृत्वाखालील सरकारच्या लैंगिक तटस्थता धोरणावर रविवारी प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते. मात्र, त्यांच्या या विधानानंतर वाद उफाळण्याची शक्यता निर्माण होण्याची आहे. नटेसन हे केरळमधील संख्यात्मकदृष्ट्या मजबूत हिंदू एझावा समुदायाचे नेते असून ते मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या जवळचे मानले जातात. असे असतानाही त्यांनी केरळ सरकारवर टीका केल्याची चर्चा आहे.

नटेसन म्हणाले की, ‘आम्ही श्री नारायण धर्म परिपालन योगम (एसएनडीपी), वर्गात मुली आणि मुलांनी एकत्र बसण्याच्या बाजूने नाही. आपली एक संस्कृती आहे. आपण अमेरिका किंवा इंग्लंडमध्ये राहत नाही. आपली संस्कृती मुला-मुलींनी एकमेकांना मिठी मारणे आणि एकत्र बसणे या गोष्टी स्वीकारत नाही. ख्रिश्चन आणि मुस्लिम शैक्षणिक संस्थांमध्ये हे होताना दिसत नाही. मात्र, नायर सर्व्हिस सोसायटी (एनएसएस) आणि एसएनडीपी द्वारे व्यवस्थापित शैक्षणिक संस्थांमध्ये अशा गोष्टी घडत आहेत. एनएसएस आणि एसएनडीपी या राज्यातील दोन प्रमुख हिंदू जातीय संघटना आहेत, असे त्यांनी सांगितले.

अशा वर्तनामुळे अराजकता निर्माण होते आणि हिंदू संघटनांद्वारे व्यवस्थापित केलेल्या महाविद्यालयांमध्ये आपण ते पाहू शकता. अशा संस्थांना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) चांगले ग्रेड किंवा निधी न मिळण्याचे हे एक कारण आहे. 18 वर्षांखालील किंवा महाविद्यालयात शिकत असलेल्या तरुण विद्यार्थी-विद्यार्थीनींनी एकत्र बसू नये किंवा एकमेकांना मिठी मारू नये कारण ते अजूनही शिकत आहेत. मुले जेव्हा मोठी होतात आणि प्रौढ होतात तेव्हा ते त्यांना हवे ते करू शकतात, असेही नटेसन यांनी म्हटले.

नटेसन यांनी असेही म्हटले आहे की, हे दुर्दैवी आहे की एलडीएफ सरकार स्वतःला धर्मनिरपेक्ष सरकार म्हणवून घेत असूनही धार्मिक दबावाला बळी पडत आहे. यातून समाजात चुकीचा संदेश जात असल्याचे मत त्यांनी मांडले. लैंगिक तटस्थ शिक्षण धोरणामुळे राज्य सरकारला विविध मुस्लिम संघटनांकडून टीकेला सामोरे जावे लागत आहे, असेही त्यांनी सांगितले.

Back to top button