मुंबई : दुधाचे दर ५ रुपयांनी वाढणार; अमूल, मदर डेअरी पाठोपाठ आता तबेलेवाल्यांकडून दरवाढ | पुढारी

मुंबई : दुधाचे दर ५ रुपयांनी वाढणार; अमूल, मदर डेअरी पाठोपाठ आता तबेलेवाल्यांकडून दरवाढ

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : अमूल आणि मदर पाठोपाठ आता मुंबईला दूध पुरवठा करणाऱ्या खासगी तबेल्यावाल्यांनीही दुधाच्या दरात ५ रुपयांनी वाढ केली आहे. सध्या ७३ रुपये लिटर या दराने विक्री होणारे सुटे दूध १ सप्टेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ पर्यंत ७८ रुपये दराने मिळणार आहे.

मुंबईला दूध पुरवठा करणाऱ्या अमूल आणि मदर डेअरी या अग्रगण्य डेअऱ्यांनी दुधाच्या दरात ऑगस्टमध्ये प्रतीलिटर २ रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर आता मुंबईत सूट्या दुधाचे दर वाढणार आहेत. त्यामुळे एक लिटर दुधासाठी ग्राहकांना आता ७८ रुपये मोजावे लागणार आहेत.

मुंबईबाहेरून आणाव्या लागणाऱ्या जनावराच्या चाऱ्याचा खर्च वाढला आहे. हरभरा सारख्या चाऱ्याचे दर वाढले आहेत. परिणामी याचा फटका दूध उत्पादकांना बसला आहे. यामुळे तबेलेवाल्या दूध उत्पादकांनी सुट्या दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मुंबई दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकुमार सिंग यांनी दिली.

मुंबईत दररोज ४५ लाख लिटर दूध विक्री होते. त्यामध्ये ७ लाख लिटर सुट्या दुधाचा समावेश आहे. हे सुटे दूध मुंबईतील आरे कॉलनी तसेच ठाणे, कल्याण, भिवंडी येथून येते. या सुट्या दुधापासून केवळ मलाई बर्फी तयार होते.
अन्य डेअऱ्यांमधील दुधापासून ताक, दही, लोणी, आईस्क्रीम, खवा पेढे, गुलाबजाम, चक्का, श्रीखंड इत्यादी पदार्थ तयार केले जातात. त्यामुळे सणासुदीच्या दिवसात मिठाईचे दर वाढणार नाहीत, असा दावा सिंग यांनी केला.

हेही वाचा 

धुळे: गणेशोत्सव शांतता, सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

औरंगाबाद : मुख्याध्यापकाने केलेल्या अपहाराची चौकशी व्हावी म्हणून ग्रामस्थांनी ठोकले शाळेला कुलूप

परभणी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीचा उडाला फज्जा

Back to top button