धुळे: गणेशोत्सव शांतता, सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन | पुढारी

धुळे: गणेशोत्सव शांतता, सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

धुळे: पुढारी वृत्तसेवा

गणेशोत्सव पर्यावरणपूरक, शांततामय आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करतानाच राज्य शासन आणि पोलिस दलातर्फे आयोजित स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात सेामवारी (दि.29)  शांतता समितीच्या सदस्यांची बैठकीत जिल्हाधिकारी शर्मा अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त देवीदास टेकाळे, सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, महानगरपालिकेच्या उपायुक्त डॉ. संगीता नांदुरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले, गणेशोत्सवासाठी जिल्हा प्रशासनातर्फे पोलिस दल, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील. रस्त्यांची दुरुस्ती, पथदिवे कार्यान्वित, विसर्जन मिरवणुकीसाठी पुरेशी प्रकाशयोजना, विसर्जनस्थळी जीवरक्षकांच्या नियुक्तीच्या सूचना महानगरपालिकेला दिल्या आहेत. वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी. मंडळाचे पदाधिकारी, नागरिकांनीही राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना, नियमांचे पालन करावे. मंडळाच्या माध्यमातून आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले.

गणेशोत्सवानिमित्त आरास स्पर्धा

राज्य शासनातर्फे उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्यातही धुळे जिल्ह्यातील मंडळांनी सहभाग नोंदवावा. त्यासाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, पर्यावरण पूरक सजावट, ध्वनिप्रदूषण रहित वातावरण, प्रबोधनपर देखावे, सजावट, भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीसंदर्भातील देखावे व सजावट, महिला, ग्रामीण भागातील वंचित घटकांच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक आदींबाबत केलेल कार्य, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा गणेशभक्तांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधा आदी निकष असल्याचे जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले आहे.

हेही वाचा:

Back to top button