औरंगाबाद : मुख्याध्यापकाने केलेल्या अपहाराची चौकशी व्हावी म्हणून ग्रामस्थांनी ठोकले शाळेला कुलूप | पुढारी

औरंगाबाद : मुख्याध्यापकाने केलेल्या अपहाराची चौकशी व्हावी म्हणून ग्रामस्थांनी ठोकले शाळेला कुलूप

जैतखेडा (औरंगाबाद); पुढारी वृत्तसेवा : जैतखेडा येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक शेख ए. के. यांनी केलेल्या अपहाराची चौकशी व्हावी व त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी यासाठी ग्रामस्थांनी आज सोमवारी (दि.२९) रोजी शाळेला कुलूप ठोकले आहे. त्यांनी शाळेतील तांदूळ आणि भांडी परस्पर विकल्याचे ग्रामस्थाच्या लक्षात आल्यावर हा प्रकार उघडकीस आला.

जैतखेडा येथील मुख्याध्यापक शेख ए. के. यांनी आठ दिवसांपूर्वी शालेय पोषण आहारासाठी आलेला तांदूळ कुणालाही न विचारता परस्पर विकून टाकला. सदरील बाब ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी सोमवार (दि.२९) रोजी शाळेत येऊन संबंधित मुख्याध्यापकाला जाब विचारला. यावेळी मुख्याध्यापक शेख यांनी मी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देण्यास बाधील नाही असे म्हणत टाळाटाळ केली. याच दरम्यान ग्रामस्थांनी सदरील ठिकाणी जाऊन पहाणी केली असता भांडारगृहात तांदूळ आणि भांडी उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. यानंतर ग्रामस्थांनी केंद्रप्रमुख शहा यांना शाळेवर बोलावून घेत मुख्याध्यापकाने केलेल्या गैरप्रकाराची माहिती सांगितली.

ग्रामस्थांना अरेरावी करणे, उडवाउडवीची उत्तरे देणे, शालेय पोषण आहारासाठीचा तांदूळ परस्पर लंपास करणे, शिक्षिकांना मानसिक त्रास देणे, विद्यार्थी तसेच पालकांकडून फिच्या नावाखाली परस्पर पैसे उकळणे असे प्रकार मुख्याध्यापक शेख याच्यावर आरोप केले आहेत. मनमानी कारभार केल्याने आणि ग्रामस्थांचा रोष पाहून मुख्याध्यापक शेख येथून पळ काढला.

सदरील बाब लक्षात घेऊन केंद्रप्रमुख शहा यांनी पंचनामा केला असुन सर्व परिस्थिती वरिष्ठांना कळविण्यात येईल असे सांगितले. परंतु, ग्रामस्थांनी झालेल्या अपहाराची चौकशी होऊन सदरील मुख्याध्यापक जोपर्यंत निलंबित होत नाही तोपर्यंत शाळा सुरू करू देणार नाही असे म्हणत शाळेला कुलूप ठोकले. यावेळी ग्रामस्थ, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, अध्यक्ष, सरपंच व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचलंत का? 

Back to top button