गडचिरोलीत वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार | पुढारी

गडचिरोलीत वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात वाघ आणि मानव यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत असून, आज ( दि. २९) सकाळी वाघाने एका शेतकऱ्याला ठार केले. आरमोरी तालुक्यातील शंकरनगरनजीकच्या सालमारा गावाजवळ ही घटना घडली. बळीराम कोलते (वय ४७, रा. सालमारा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या नरभक्षक वाघाने भागात आतापर्यंत ११ जणांचा बळी घेतला आहे. वाघाच्या दहशतीमुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी बाहेर निघणे कठीण झाले आहे.

आरमोरी तालुक्यातील सालमारा येथील बळीराम कोलते आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शंकरनगर मार्गावरून सायकलने जात होते. वाटेत नाला असल्याने ते सायकलवरून उतरून पायी जाण्यास निघाले. मात्र, झुडुपात दबा धरून बसलेल्या वाघाने बळीरामवर हल्ला करून त्यास ठार केले. वाघाने बळीरामला जंगलात फरफटत नेल्याचे दिसून आले आहे.

या घटनेनंतर जोगीसाखरा गावचे सरपंच संदीप ठाकूर, रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप घोडाम आदींच्या नेतृत्वात संतप्त नागरिकांनी वाघाचा बंदोबस्त करावा, मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना तत्काळ ५० हजार रुपयांचे आर्थिक मदत द्यावी आणि शेतकऱ्यांना शेतीच्या कामावर जाण्यासाठी संरक्षण द्यावे इत्यादी मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन केले. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याच दरम्यान वनाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांशी आंदोलनकर्त्यांनी चर्चा केली.

हेही वाचा :  

Back to top button