नगर : वांबोरी चारीद्वारे तलावांमध्ये सोडले पाणी | पुढारी

नगर : वांबोरी चारीद्वारे तलावांमध्ये सोडले पाणी

करंजी, पुढारी वृत्तसेवा : गेल्या तीन वर्षांपासून मुळा धरण ओव्हरफ्लो होताच पाथर्डी तालुक्याला वांबोरी चारीद्वारे पाणी सोडण्यात येत आहे. दहा वर्षांत जेवढे पाणी या भागाला मिळाले नाही, तेवढे पाणी मागील दोन वर्षांत देण्याचा प्रयत्न केला. योजनेतील सर्व लाभधारक तलावांमध्ये पाणी पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

मुळाधरण ओव्हरफ्लो होण्यापूर्वीच आमदार तनपुरे यांनी मुळा पाटबंधारे विभागाची बैठक घेऊन सर्व तांत्रिक बाबी दूर करून वांबोरी चारीला पाणी सोडण्याचे नियोजन आखले. वांबोरी चारीला चार दिवसांपासून दोन पंपाद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. करंजी लाईनला सध्या पाणी सुरू असून, सातवड तलावात पाणी पोहोचले आहे. प्रत्येक तलावात पूर्ण दाबाने पाणी येत आहे का, शेतकर्‍यांच्या काही अडचणी आहेत का, यासाठी आ.तनपुरे यांनी रविवारी (दि.28) लाभधारक तलावावर जाऊन शेतकर्‍यांशी संवाद साधला.

यावेळी आमदार तनपुरे म्हणाले, वांबोरी चारीची मागील थकबाकी पूर्णपणे भरण्यात आलेली असल्याने पाणी सोडण्यात येणारे अडथळे आता कायमचे दूर झालेले आहेत. आम्ही पाणी देणारे आहोत, पाणी अडवणारे नाही राहुरीचे लोक आमदार झाले तर पाणी येऊ देणार नाही असा गोड समज विरोधकांनी पूर्वी केला होता. तो देखील प्रत्यक्षात कृतीद्वारे आम्ही दूर केला.

यावेळी बाबासाहेब भिटे, सरपंच अमोल वाघ, रवींद्र मुळे, विलास टेमकर, राजेंद्र पाठक, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रफीक शेख, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष अंबादास डमाळे, शिवसेना तालुका संघटक राजेंद्र म्हस्के, चेअरमन संतोष गरुड, विजय पालवे, मुळा पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी एस. डी. कांबळे, कालवा निरीक्षक पी. एन. गरगडे, बी. डी. थोरात व शेतकरी उपस्थित होते.

पैशांची मागणी केल्यास कारवाई

प्रत्येक लाभदायक तलावात पाणी पोहोचणार आहे. कोणीही पाईपलाईन अथवा एअरव्हॉल्व्हचा बिघाड करू नये. तसेच, पाण्यासाठी कोणत्याही शासकीय अथवा खासगी कर्मचार्‍याने शेतकर्‍यांकडे पैशाची मागणी केल्यास त्याची देखील गय केली जाणार नाही, असा सूचक इशाराही आमदार तनपुरे यांनी यावेळी दिला.

Back to top button