रत्नागिरी : ‘रस्त्यात खड्डा, खड्ड्यात रस्ता..’, भरणेनाका सर्व्हिस रोडवर गोट्या खेळत राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन | पुढारी

रत्नागिरी : 'रस्त्यात खड्डा, खड्ड्यात रस्ता..', भरणेनाका सर्व्हिस रोडवर गोट्या खेळत राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन

खेड(पुढारी वृत्तसेवा) : कोकणातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याची मागणी करत राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम आक्रमक झाले. शनिवारी दि.२७ रोजी भरणेनाका येथील सर्व्हिस रोडवर त्यांनी गोट्या खेळत रस्त्याच्या बाजूला लोळत अनोखे आंदोलन केले. गणेशोत्सवा पूर्वी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवले जावेत अशी मागणी त्यांनी केली.

कोकणातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शनिवारी दि २७ रोजी मुंबई- गोवा महामार्ग परिसरात भरणे येथील सर्व्हिस रोडवरील खड्ड्यांमधे गोट्या खेळण्याची स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धे च्या माध्यमातून रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्येकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आंदोलनाला माजी आमदार संजय कदम उपस्थित होते. त्यांनी रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात लोळत घोषणाबाजी केली. ‘रस्त्यात खड्डा, खड्ड्यात रस्ता..’ अशा घोषणा यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी दिल्या.

यावेळी माजी आमदार कदम म्हणाले, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण सध्या मुंबई-गोवा हायवेचा पाहणी दौरा करत आहेत. गणेशोत्सव काही दिवसात सुरू होईल. त्यापुर्वी या खड्ड्यातूनच चाकरमान्यांना उत्सवासाठी यावे लागणार आहे. महामार्ग अनेक ठिकाणी खचला आहे. अपघात होऊ लागले आहेत. कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांसमोर खड्ड्यांचे विघ्न आहे. २५ ऑगस्टपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजवले जातील, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली होती. दोन दिवसांपूर्वी त्यांनी महामार्गाची पाहणी केली तरीदेखील खड्डे आणि धोकादायक जैसे थे आहे, असे ते म्हणाले.

 

Back to top button