पिंपरी : एसटीकडून ग्रुप बुकिंग व्यवस्था पूर्ववत | पुढारी

पिंपरी : एसटीकडून ग्रुप बुकिंग व्यवस्था पूर्ववत

पिंपरी : ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एस. टी च्या वल्लभनगर आगारातून कोकणवासीयांसाठी ग्रुप बुकिंग व्यवस्था बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आमदार महेश लांडगे यांनी आगारप्रमुखांशी चर्चा करुन ही सुविधा पूर्ववत केली आहे.
28 ते 30 ऑगस्टदरम्यान एकूण 12 गाड्या ग्रुप बुकिंगसाठी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे कोकणवासीय प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. या वेळी माजी नगरसेवक शीतल शिंदे, सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष अजय पाताडे, कोकण प्रवासी संघाचे अध्यक्ष दादा हाटले, सिंधुदुर्ग एकता मित्र मंडळाचे विलास गवस, सचिन फोंडके आदी उपस्थित होते.

गणेशोत्सवासाठी दरवर्षी पिंपरी-चिंचवड शहरातून हजारोंच्या संख्येने कोकणवासी आपापल्या गावाला जात असतात. यासाठी शहरातील विविध संस्थेच्या माध्यमातून एस. टी. महामंडळाकडून ‘ग्रुप बुकिंग’द्वारे गाड्यांचे बुकिंग केले जाते. यावर्षी वल्लभनगर आगारातून ग्रुप बुकिंगला मान्यता दिली होती. त्याप्रमाणे सुमारे 30 गाड्यांसाठी प्रवाशांचे पैसे जमा करून ‘ग्रुप बुकिंग’ घेण्यात आले. मात्र, ऐनवेळी ‘ग्रुप बुकिंग’ला गाड्या देता येणार नाहीत, असे सांगण्यात आले. परिणामी कोकणात जाणार्‍या या सर्व प्रवाशांची अडचण झाली होती.

दरम्यान, शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आगार प्रमुखांना याचा जाब विचारला. मात्र, प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. अखेर आमदार लांडगे यांनी थेट वल्लभनगर आगारात भेट दिली. आगारप्रमुख आणि संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा केली. गाड्या उपलब्ध करुन देण्याबाबत परिवहन मंत्र्यांकडे मागणी करू, पण प्रवाशांना वेठीस धरू नका, असे ठामपणे सांगितले.

Back to top button