लष्कर-ए-तोयबाच्या निशाण्यावर होत्या उत्तर प्रदेशातील भाजपच्या रॅली | पुढारी

लष्कर-ए-तोयबाच्या निशाण्यावर होत्या उत्तर प्रदेशातील भाजपच्या रॅली

पुणे; पुढारी वृत्तसेवा : लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेतील संशियत दहशदवादी जुनैद व त्याचे साथीदार उत्तर प्रदेश व दिल्ली येथे घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्याची माहिती उघड झाली. त्याचबरोबर नरसिंहानंदन सरस्वती, गायक संदिप आचार्य, जितेंद्र नारायण ऊर्फ वसीम रिझवी या तीन प्रमुख व्यक्‍तींवर हल्ला, तसेच उत्तर प्रदेशातील भाजपच्या रॅलीवर हल्ला करण्याचाही प्लॅन त्यांनी तयार केला असल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) जुनैदसह त्यांच्या चार साथीदारांवर शनिवारी पुणे येथील न्यायालयात दोन हजार पानी दोषारोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटके बनवायला लागणाऱ्या गोष्टी आणि पैसे हे थेट पाकिस्तानात बसलेल्या एका मास्टर माईंडकडून येणार होते. जो प्लॅन आखला जाणार होता त्यासाठी जुनेद मोहम्मद निघण्याच्या तयारीत होता. मात्र त्या आधीच राज्य दहशतवाद विरोधी पथकाने त्याला ताब्यात घेतले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘एटीएस’ने जुनैद यास जम्मू-काश्‍मीरमधील दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून २४ मे रोजी काही महिन्यांपूर्वी दापोडी परिसरातून अटक केली होती. त्यानंतर पथकाने जुनैदचे साथीदार इनामूल हक, युसूफ व आफताब हुसेन शाह यांनाही अटक केली होती. जम्मू काश्‍मीरमधील एका दहशतवादी संघटनेकडून जुनैदला दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरविण्यात आल्याचे ‘एटीएस’ने केलेल्या चौकशीतून निष्पन्न झाले होते. त्यानंतर पथकाने जम्मू-काश्‍मिरमधून युसूफ व आफताब शाह यांना अटक केली होती. तर इनामूल हकला उत्तरप्रदेशातील सहारनपूर येथून बेड्या ठोकल्या होत्या.

जुनैद हा मुळचा बुलढाणा येथील असून त्याचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. तो समाज माध्यमातून जम्मू-कश्‍मीरमधील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात आला होता. त्यानंतर जुनैद व त्याचे साथीदार दिल्ली व उत्तरप्रदेशामध्ये घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पथकाने केलेल्या चौकशीतुन पुढे आली. दरम्यन, ‘एटीएस’ने शनिवारी न्यायालयात चारही आरोपींविरुद्ध दोन हजार पानांचे दोषारोपपत्र सादर केले होते. त्यामध्ये संबंधित आरोपींनी उत्तर प्रदेश व दिल्ली येथे घातपाती कारवाया करण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. तसेच त्यांनी नरसिंहानंद सरस्वती, गायक संदिप आचार्य व जितेंद्र नारायण ऊर्फ वसीम रिझवी या तीन प्रमुख व्यक्तींवर हल्ले करण्याचा प्लॅन केल्याची माहिती सुत्रांनी दिली.

भाजपच्या रॅलीवर हल्ला करण्याचा प्लॅन

उत्तर प्रदेशमध्ये आगामी काळात भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या रॅली निघणार आहेत. त्यादृष्टीने जुनैद व त्याच्या साथीदारांनी भाजपच्या रॅलीवर हल्ला करण्याचाही प्लॅन केला होता. त्यासाठी लागणारी स्फोटके बनविण्यासाठीच्या वस्तु व पैसे त्यांना थेट पाकीस्तानातील त्यांच्या मास्टरमाईंकडून मिळणार होता. हा सर्व प्लॅन जुनैदच्या देखरेखीखाली सुरु होता, त्याचवेळी ‘एटीएस’ने त्याला ताब्यात घेतले. जम्मु कश्‍मिरमधील दहशतवादी संघटनेशी जुनैद हा समाजमाध्यमांद्वारे संपर्कात आला होता. त्यांच्या संपर्कात आल्यानंतरही त्याने 17 बनावट फेसबुक खाती तयार करुन तरुणांना या कटामध्ये सहभागी करुन घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधत होता.

कोण आहेत नरसिंहानंद सरस्वती, जितेंद्र नारायण व संदिप आचार्य ?

नरसिंहानंद सरस्वती हे गाझियाबादमध्ये असलेल्या “शिव शक्ती धाम’चे महंत आहेत. त्यांच्याकडून हिंदू स्वाभिमान नावाची संस्था चालविली जाते. जितेंद्र नारायण उर्फ वसीम रिजवी हे मुळचे उत्तर प्रदेश ‘शिया वक्‍फ बोर्डा’चे ते माजी चेअरमन आहेत. त्यांनी काही महिन्यांपुर्वीच सनातन धर्मात प्रवेश केला होता. तर गायक संदिप आचार्य हे योगी आदित्यनाथ यांचे स्टार प्रचारक होते. एका वादग्रस्त गाण्यांचे लेखक म्हणूनही ते परिचीत आहेत.

हेही वाचा 

Back to top button