देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंवर प्रेम, दया, ‘करुणा’ दाखवली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी | पुढारी

देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंवर प्रेम, दया, 'करुणा' दाखवली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी

पुढारी ऑनलाईन: राज्याच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार घमासान आणि जुगलबंदी, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना भाजपाकडून प्रत्येकी ५० कोटी रूपये देण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्ष सातत्याने करत आहेत. सोमवारी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर उभे राहून जोरदार घोषणाबाजी केली. “खाऊन खाऊन पन्नास खोके, माजलेत बोके ” अशा घोषणा देत विरोधी पक्षांनी शिंदे गटाला टोला लगावला. त्यानंतर, सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यावर देखील फटकेबाजी केली. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी एकनाथ शिंदे यांना ऐकनाथ होऊ नका, असा टोला लगावला. आमदार मुंडे यांच्या या टिकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी जशास तसं उत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना पक्षातील अंतर्गत संघर्ष आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये होणारी घुसमट यामुळे बंडखोरी केली. त्यांनी सुरूवातील अगदी १२-१५ आमदारांना घेऊन ते सूरतला गेले. अखेरीस शिवसेनेचे सुमारे ४० आमदार आणि काही अपक्ष आमदार यांच्या साथीने शिंदे गटाने भाजपासोबत राज्यात सत्तास्थापना केली. सातत्याने शिंदे गटाच्या आमदारांना विरोधकांकडून गद्दार म्हटले जाते. ५० कोटी रुपये घेतल्याचे म्हणतही डिवचले जाते. या आरोपाला देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभागृहात उत्तर दिलं आहे.

विधिमंडळाच्या बाहेर ओरडणाऱ्या लोकांकडे फक्त दोनच शब्द आहेत, या दोन शब्दांशिवाय यांच्याकडेबोलण्यासाठी दुसरं दुसरं काही नाही. आमदार धनंजय मुडे गेल्या आठवड्यात जोरात ओरडत होते की, चलो गुवाहटी… चलो गुवाहटी. ते अगदी बेंबीच्या देटापासून ओरडत होते. जसं काय ते खूप वर्षांपासूनचे जुने शिवसैनिक आहेत. आता, मी यांच्याबद्दल काय बोलावं, तुमचा सर्व प्रवास मला माहितीय, असे बोलत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी धनंजय मुंडेंवर टिका केली. तुमच्याबद्दल आम्हाला सगळं माहितीय, तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तुमच्यावर प्रेम, दया, करुणा दाखवली. पण, ती परत परत दाखवता येणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभा सभागृहात तुफान फटकेबाजी केली. यानंतर सभागृहात चांगलाच हशा पिकला. जनतेतून सरपंच निवडीची मागणी ही आमची नाही तर, सरपंच परिषदेची होती, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर हे पावसाळी अधिवेशन तुफान वादळी होणार याची साऱ्यांनाच कल्पना होती. त्या प्रमाणे अधिवेशनाचे पहिले दोन दिवस तुलनेने थोडे शांततेत गेले. पण सोमवारी मात्र महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.

Back to top button