शिरगाव: पुलाची उंची वाढविण्सायाठी काँग्रेसचे धरणे आंदोलन | पुढारी

शिरगाव: पुलाची उंची वाढविण्सायाठी काँग्रेसचे धरणे आंदोलन

राशिवडे/कौलव;पुढारी वृत्तसेवा: भोगावती नदीवरील शिरगाव-आमजाई व्हरवडे हा नव्याने उभारलेल्या पुलाची उंची वाढवण्याच्या मागणीसाठी काँग्रेसकडून धरणे आंदोलन करण्यात आले.  या आंदाेलनाची दखल न घेतल्यास, सर्वपक्षीय समितीच्या वतीने आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात कॉग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी गोकुळचे संचालक आणि राष्ट्रवादीचे रणजित पाटील यांनी देखील उपस्थितीती दर्शवत या आंदोलनाला पाठींबा दिला.

भोगावती नदीवर सुमारे नऊ कोटी रुपये खर्चून नवीन वहातूक पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. माथा पातळीवरील तीन स्पॅम जोडले असून, पहिल्याच पुरात हा पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंधाधुंदी कारभाराबद्दल संतापाची लाट उसळली आहे. यामुळे संतप्त नागरिक आणि राधानगरी तालुका काँग्रेसच्यावतीने आमजाई व्हरवडे येथे पुलाची उंची वाढवण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी नऊ कोटी रुपये खर्चूनही पाण्याखाली जाणाऱ्या फुलाची उभारणी कशासाठी करण्यात आली आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. या पुलाची उंची तात्काळ वाढवावी अन्यथा काम सुरू करू दिले जाणार नाही तसेच सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही आंदोलकांना दिला. यावेळी उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी केली. याबाबतचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता शिवाजी इंगवले व प्रवीण कदम यांना देण्यात आले.  या आंदोलनात तालुका काँग्रेसचे अध्यक्ष हिंदुराव चौगुले, समन्वयक सुशील पाटील-कौलवकर, गोकुळ दूध संघ व जिल्हा बँकेचे संचालक रणजीत सिंह पाटील, बिद्री साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र पाटील, गोकुळचे संचालक विजयसिंह मोरे, माजी संचालक पी. डी. धुंदरे, भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष संजयसिंह पाटील, भोगावतीचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, संचालक ए.डी.चौगुले, विश्वनाथ पाटील, धीरज डोंगळे, रविंद्र पाटील, मोहन डवरी, बी.आर.पाटील, जयवंतराव कांबळे, भिवाजी पाटील, शहाजी कवडे यांच्यासह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

नव्या राजकीय बदलाचे संकेत

काँग्रेसच्या या आंदोलनामध्ये माजी आमदार के.पी.पाटील यांचे पुत्र, गोकुळचे संचालक रणजित पाटील यांनी उपस्थिती लावली. काँग्रेसच्या धरणे आंदोलनामध्ये राष्ट्रवादीचे रणजित पाटील यांनी हजेरी लावली. त्यामुळे नव्या राजकीय बदलाचे संकेत मिळत आहेत. या आंदोलनामध्ये काँग्रेसचे आमदार पी.एन.पाटील गटाचे सर्व संचालक, तसेच आमदार सतेज पाटील गटाचे विजय मोरे, सदाशिवराव चरापले उपस्थित होते.

 

Back to top button