भंडारा: वैनगंगा नदीच्या पुरात बुडून लाईनमनचा मृत्यू | पुढारी

भंडारा: वैनगंगा नदीच्या पुरात बुडून लाईनमनचा मृत्यू

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : तीन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे वैनगंगा नदीला पूर येऊन भीषण पूर स्थिती निर्माण झाली होती. तथापि वैनगंगा नदी अद्यापही धोक्याच्या पातळीवर वाहत असल्याने काही ठिकाणी पूरस्थिती कायम आहे. दरम्यान, वीज दुरुस्तीच्या कामासाठी गेलेल्या लाईनमनचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज (दि.१७) दुपारी भंडारा शहरालगत असलेल्या बैल बाजार परिसरात घडली. संदीप बाळकृष्ण चौधरी (वय ४०, रा. किसान चौक, भंडारा) असे मृत लाईनमनचे नाव आहे.

संदीप चौधरी आज दुपारी ते मेंढा येथील बैल बाजार परिसरात वीज दुरुस्तीसाठी गेले होते. दरम्यान त्याठिकाणी पुराच्या पाण्यात ते बुडाले. त्यांना तत्काळ शहरातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी मृत घोषीत केले.

वैनगंगा नदीची धोका पातळी २४५.५० मीटर असून १५ ऑगस्टरोजी सकाळी ७.३० वाजता वैनगंगा नदीने २४५.५० मीटर ही धोक्याची पातळी ओलांडली. या पुराचा सर्वाधिक फटका भंडारा शहराला बसला. नदीकाठावरील गावांमध्ये आणि शहरातील सखल भागांमध्ये पाणी शिरल्याने अडकलेल्या नागरिकांना बचाव पथकाच्या मदतीने सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत ३,३१३ नागरिकांना हलविण्यात आले होते. भंडारा शहरातील कस्तुरबा गांधी वॉर्ड, गणेशपूर, भोजापूर, ठोक भाजी मार्केट, श्री साई मंदिर, भंडारा शहरातील जलशुद्धीकरण केंद्र, निर्माणधीन असलेले जिल्हा महिला रुग्णालय, ग्रामसेवक कॉलनी, कपिलनगर ही ठिकाणे जलमय झाली होती.

याशिवाय तुमसर, मोहाडी आणि लाखांदूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. प्रमुख राज्यमार्गांसह ८१ मार्ग बंद पडली होती.
पावसाने उसंत घेतल्याने पूर ओसरण्यास मदत होत आहे. परंतु, पूर ओसरण्याचा वेग अत्यंत कमी आहे. मध्यरात्रीपासून पूर ओसरणे सुरु झाले. आंतरराज्य बपेरा-बालाघाट मार्गावरील बावनथडी नदीवर आलेला पूर आज दुपारी ओसरल्याने या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली. आता संपूर्ण पूर ओसरल्यानंतर सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेल्या नागरिकांना आपल्या घरी जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तत्पूर्वी निवारा केंद्रांमध्ये नागरिकांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले आहे.

दरम्यान या पुरामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. भंडारा आणि तुमसर तालुक्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नव्याने स्वच्छता करावी लागणार आहे. घर कोसळल्याने अनेकांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकाच महिन्यात दोनदा पुराचा फटका बसल्याने नागरिक हतबल झाले आहेत. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, बचाव पथक व संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेने पुराची स्थिती उत्तमरित्या हाताळण्यात यश मिळविले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button