विनायक मेटे यांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप | पुढारी

विनायक मेटे यांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप

बीड, पुढारी वृत्तसेवा ः शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांना सोमवारी शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. बीड शहरातील कॅनॉल रोड भागातील त्यांच्या शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्यभरातून लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री, आमदार, विरोधी पक्षनेते यांची उपस्थिती होती.

माजी आमदार विनायक मेटे यांचा पुणे-मुंबई एक्सपे्रस हायवेवर अपघाती मृत्यू झाला होता. सोमवारी सकाळी त्यांचे पार्थिव निवासस्थानी व त्यानंतर शिवसंग्राम भवन येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. दुपारी एक वाजता त्यांची अंत्ययात्रा अंत्यसंस्कार स्थळाकडे मार्गस्थ झाली. साडेचार वाजता त्यांच्यावर जालना रोड येथील शेतात शासकीय इतमामात अंत्यविधी करण्यात आला. शेवटचा निरोप देण्यासाठी प्रचंड जनसमुदाय या वेळी उपस्थित होता.यावेळी त्यांना पोलिसांकडूनही मानवंदना देण्यात आली. शोकाकुल वातावरणात विनायक मेटे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंत्यदर्शन घेत आपल्या भावना व्यक्त केल्या. विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे, मुलगा आशुतोष मेटे, मुलगी आकांक्षा मेटे यांची यावेळी उपस्थिती होती. मुलगा आशुतोष याने मुखअग्नी दिला.

या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, खासदार इम्तियाज जलील, राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार, राधाकृष्ण विखे पाटील, तानाजी सावंत, गिरीश महाजन, आमदार प्रवीण दरेकर, माजी मंत्री राजेश टोपे, हरिभाऊ बागडे, आमदार सुरेश धस, सदाभाऊ खोत, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, मराठा आरक्षण राज्य समन्वयक विनोद पाटील इत्यादी उपस्थित होते.

हेही वाचलंत का?

Back to top button