Santosh Bangar : आमदार संतोष बांगरांनी कंपनी व्यवस्थापकाच्या श्रीमुखात लगावली | पुढारी

Santosh Bangar : आमदार संतोष बांगरांनी कंपनी व्यवस्थापकाच्या श्रीमुखात लगावली

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : शहरासह जिल्हाभरात बांधकाम कामगारांसाठी खराब झालेल्या पोळ्या, करपलेला भात अन् निकृष्ठ दर्जाचे वरण व भाजी पाहून संतापलेल्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी सोमवारी दुपारी औद्योगिक वसाहतीमध्ये जाऊन कंपनीच्या व्यवस्थापकाच्या श्रीमुखात लगावली. कामगारांच्या आरोग्याशी खेळू नका असा सज्जड दमही त्यांनी दिला.

जिल्हयात बांधकाम कामावर असलेल्या सुमारे 25 हजार पेक्षा अधिक कामगारांना मध्यान्ह भोजन दिले जाते. त्यासाठीचे कंत्राट मुंबई येथील गुनीना कंपनीला देण्यात आले आहे. त्यासाठी कंपनीला एका थाळी प्रमाणे सुमारे 67 रुपये दिले जातात. यामध्ये कंपनीने दिलेल्या मेन्यूनुसार भोजन पुरवणे आवश्‍यक आहे. मात्र मागील काही दिवसांपासून या भोजनाबाबत वारंवार तक्रारी येऊ लागल्या होत्या.

Santosh Bangar व्यवस्थापकाच्या श्रीमुखात भडकावली 

आमदार संतोष बांगर यांनी सोमवारी दुपारच्या सुमारास कंपनीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या कार्यालयास व भोजन कक्षास भेट दिली. तेथील सर्व प्रकार पाहून आमदार बांगर चांगलेच संतापले. त्याठिकाणी करपलेल्या पोळ्या, भात देखील योग्य पध्दतीने शिजवलेला नाही, डाळीमध्ये पाणीच जास्त होते. या प्रकारानंतर आमदारांनी तेथील व्यवस्थापनाकडे चौकशी केली असता त्याने दररोजचा मेन्यू सांगितला. मात्र आज त्या मेन्यू नुसार भोजनच तयार केले नाही तर निकृष्ठ भोजन दिसल्याने आमदार बांगर यांनी तेथील व्यवस्थापकाच्या श्रीमुखात भडकावली.

त्यानंतर कंपनीच्या मालकाशी दुरध्वनीवरून संपर्क साधून त्यांचीही चांगलीच कान उघाडणी केली. कामगारांना निकृष्ठ दर्जाचे भोजन देऊन त्यांच्या आरोग्याशी का खेळताय, शासनाची योजना चांगल्या पध्दतीने राबवला अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही आमदार बांगर यांनी दिला. त्यानंतर हा प्रकारा कामगार अधिकारी टी. ई. कराड यांच्या कानावरही घातला. यावेळी युवासेनेचे जिल्हा प्रमुख राम कदम, जिल्हा परिषदेचे माजी सभापती फकीरराव मुंडे यांची उपस्थिती होती.

या प्रकरणात संबंधित कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने हिंगोलीत हजर होण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा मागविणार असून या संदर्भातील अहवाल देखील वरिष्ठ कार्यालयास सादर केला जाणार आहे सरकारी कामगार अधिकारी कराडे यांनी सांगितले.

हेही वाचलंत का?

 

Back to top button