West Indies vs India 4th T20I : भारताचे वेस्ट इंडिज समोर १९२ धावांचे आव्हान | पुढारी

West Indies vs India 4th T20I : भारताचे वेस्ट इंडिज समोर १९२ धावांचे आव्हान

फ्लोरिडा; पुढारी ऑनलाईन : भारताने चौथ्या टी २० सामन्यात वेस्ट इंडिज (West Indies vs India 4th T20I) समोर ५ गड्यांच्या मोबदल्यात १९२ धावांचे आव्हान उभे केले. रिषभ पंतच्या ४४, कर्णधार रोहित शर्मा याच्या ३३ धावा आणि संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांच्या अखेरच्या षटकातील धावांच्या जोरावर भारताने १९१ धावांपर्यंत मजल मारली. सुरुवातीला २०० हून अधिक धावा भारत उभा करु शकेल असे वाटत होते. परंतु मधल्या षटकांमध्ये वेस्ट इंडिजच्या फिरकी गोलंदाजीच्या अचूक माऱ्यापुढे भारताने गडी गमावल्यामुळे धावांच्या गतीला अंकुश ठेवण्यात विंडिजला यश आले. हा सामना जिंकून भारत मालिका पदरात टाकण्याचा पर्यंत करेल.

मैदानावर दव पडल्यामुळे काहिसा उशिरा सुरु झालेल्या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातील सलामीवीर रोहित शर्मा आणि सुर्यकुमार यांनी ताबडतोब फटकेबाजी सुरु केली. त्यांनी पहिल्या तीन षटकात भारताचा स्कोर ३९ वर पोहचवला. त्यानंतर पाचव्या षटकात ५३ धावांवर रोहित शर्मा त्रिफळाचित झाला. त्याने फिरकी गोलंदाज अकील हुसेन याला आधी षटकार ठोकला आणि त्या पुढील चेंडूवर बोल्ड झाला. रोहितने तडाखेबाज फटकेबाजी करत अवघ्या १६ चेंडूत ३३ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने २ चौकार आणि ३ षटकार ठोकले. रोहित पाठोपाठ सुर्यकुमार देखिल सहाव्या षटकात बाद झाला. त्याने १४ चेंडूत २४ धावा केल्या. त्याला अल्झारी जोसेफ याने पायचीत केले. सुर्याने देखिल १ चौकार आणि २ षटकारांची आतषबाजी केली. दोन्ही सलामीवीर तंबुत परतल्यावर ऋषभ पंत आणि दीपक हुडा हे नवे खेळाडू मैदानात उतरले.

दीपक हुडा आणि ऋषभने भारताचा डाव सावरला. त्यांनी धावगती स्थिर ठेवत धावांमध्ये भर घालण्याचा पर्यंत केला. या जोडीने मैदानात स्थिर होत भारताला शंभरी पार पोहचले. पण अखेर बाराव्या षटकात भारताची धावसंख्या २ बाद १०८ असताना अल्झारी जोसेफच्या गोलंदाजीवर दीपक हुडा ब्रॅडम किंगकडे झेल देऊन २१ धावांवर बाद झाला. त्याने २१ चेंडूचा सामना केला. ऋषभ पंतने मैदानात स्थिरावत चौफेर फटकेबाजी केली. तो चांगल्या लयीमध्ये देखिल दिसत होता. त्याने संजू सॅमसनला सोबत घेऊन जबाबदारीने खेळ करत भारताच्या धावसंख्येत मोलाची भर घातली. पंधराव्या षटकात ओबेड मकॉय याच्या गोलंदाजीवर झेल देऊन ऋषभ बाद झाला. ऋषभने ३१ चेंडूत ४४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या खेळीत त्याने ६ चौकार ठोकले. ऋषभ पंत बाद झाल्यावर दिनेश कार्तिक मैदानात उतरला पण त्याला फारसे यश आले नाही. तो अवघ्या ६ धावा करुन तंबुत परतला. १९ व्या षटकात मोठा फटका मारण्याच्या नादात तो मकॉयची शिकार ठरला.

संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांनी शेवटच्या दोन षटकात चांगली फटकेबाजी केली. अक्षर पटेलने दोन मोठे षटकार ठोकले. या दोघांच्या खेळीमुळे भारतला १९१ धावांपर्यंत मजल मारता आली. संजू सॅमसन याने २३ चेंडूत ३० धावा करुन नाबाद राहिला. या खेळीत त्याने १ षटकार आणि २ चौकार लगावले. तर अक्षर पटेल याने अवघ्या ८ चेंडूत २० धावांची तडाखेबाज खेळी केली. त्याने १ चौकार आणि २ षटकारांची आतषबाजी केली.

वेस्ट इंडिजकडून ओबेड मकॉय याला दोन बळी मिळवता आल्या पण, त्याला भारतीय फलंदाजांनी चांगलाच चोप दिला. त्याने ४ षटकात तब्बल ६६ धावा दिल्या. अल्झारी जोसेफ चार षटकात ३१ धावा देत दोन गडी बाद करण्यात यशस्वी ठरला. तर जेसन होल्डर आणि डॉमिनीक ड्राकेस यांना बळी मिळविण्यात अपयश आले. तसेच फिरकी गोलंदाज अकील हुसेन याने रोहित रुपात एकमेव मोठी विकेट मिळवली.

Back to top button