CSK vs SRH | MS Dhoni च्या नावावर IPLमध्ये नवा विक्रम! ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू | पुढारी

CSK vs SRH | MS Dhoni च्या नावावर IPLमध्ये नवा विक्रम! 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

पुढारी ऑनलाईन डेस्क : महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) याने रविवारी (दि. २८ एप्रिल) आयपीएलमध्ये (IPL) आणखी एका विक्रमाची नोंद केली. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात धोनी एक खेळाडू म्हणून १५० व्या आयपीएल विजयाचा एक भाग बनला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा ७८ धावांनी पराभव केला. चेन्नई फलंदाजीमध्ये शक्तीशाली असलेल्या संघाला केवळ १३४ धावांत गुंडाळल्यानंतर धोनीने ही कामगिरी केली. (CSK vs SRH)

एमएस धोनीने IPL मध्ये २५९ सामने खेळले आहेत. २००८ पासून आयपीएल सुरु झाल्यापासून तो T20 लीगचा भाग आहे. ४२ वर्षीय धोनी हा IPL मध्ये ५ विजेतेपदे मिळवून देणारा यशस्वी कर्णधार आहे. सध्या सुरु असलेल्या आयपीएल हंगामापूर्वी धोनीने चेन्नई सुपर किंग्जची धुरा ऋतुराज गायकवाडकडे सोपवली होती.

ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जने रविवारी सनरायझर्स हैदराबादचा तब्बल ७८ धावांनी दारूण पराभव केला. हैदराबादला सलग दुसर्‍या पराभवाचा सामना करावा लागला. आधी ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबेची झंझावाती फलंदाजी आणि नंतर तुषार देशपांडेची घातक गोलंदाजी या मराठी माणसांच्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर चेन्नईने दोन गुण मिळवले.

IPL मधील खेळाडूने जिंकलेले सर्वाधिक सामने

एमएस धोनी- १५०
रवींद्र जडेजा- १३३
रोहित शर्मा- १३३
दिनेश कार्तिक- १२५
सुरेश रैना- १२२

महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) नावावर १३३ विजयांसह आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधाराचा विक्रम आहे. रोहित शर्मा ८७ विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना चेन्नई संघाने ऋतुराज गायकवाड (९८) आणि शिवम दुबे (३९) यांच्या फलंदाजीच्या जोरावर हैदराबाद संघाला २१३ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदरबाद संघ १३४ धावांवरच गारद झाला. तुषार देशपांडेने २७ धावांत ४ विकेट घेतल्या.

ऋतुराजने ९८ धावा करून हैदराबादसमोर २१३ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले. ऋतुराजने ३ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने ५४ चेंडूंत ९८ धावांची खेळी केली. त्याला डॅरिल मिशेलने चांगली साथ देत ५२ धावा कुटल्या. मग शिवम दुबेने २० चेंडूंत ३९ धावांची स्फोटक खेळी केली. नेहमीप्रमाणे महेंद्रसिंह धोनीने फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न केला, ज्यात त्याला २ चेंडूंत ५ धावा करता आल्या. अखेर चेन्नईने निर्धारित २० षटकांत ३ बाद २१२ धावा करून हैदराबादला विजयासाठी २१३ धावांचे आव्हान दिले. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार, टी नटराजन आणि जयदेव उनाडकट यांना प्रत्येकी १-१ बळी घेतला.

हे ही वाचा :

Back to top button