India @75 : नवी दिल्ली, दिनांक १५ ऑगस्ट १९४७… | पुढारी

India @75 : नवी दिल्ली, दिनांक १५ ऑगस्ट १९४७...

१५ ऑगस्ट १९४७ या शुभदिनाची एक स्मृती अनेक वर्षांच्या कालापव्ययात टिकून राहण्याइतकी चिरस्थायी होती. ती म्हणजे, त्या दिवशी इंडिया गेटजवळ झालेल्या ध्वजारोहण समारंभासाठी जमलेला जनसागर. सायंकाळी पाच वाजता, पहिल्या महायुद्धात धारातीर्थी पडलेल्या नव्वद हजार हिंदी जवानांच्या स्मृतिस्तंभासमोरच्या मैदानात भारताचा तिरंगा राष्ट्रध्वज अधिकृत इतमामाने उभारण्यात येणार होता. पूर्वीचा इतिहास डोळ्यांसमोर ठेवून लुई माऊन्टबॅटन व त्यांच्या सल्लागारांनी उपस्थितांची संख्या तीस एक हजारांच्या आसपास अपेक्षिली होती; पण प्रत्यक्षात जमला अफाट जनसमुदाय, अशी आठवण लेखक डॉमिनिक लॉपिए/लॅरी कॉलिन्‍स यांच्‍या फ्रीडम ॲट मिडनाईट (अनुवाद : माधव मोर्डेकर) पुस्‍तकात नमूद करण्‍यात आली आहे.

तो कट्टा वादळी समुद्रात तरंगणाऱ्या तराफ्यासमान भासत होता..

पाच लाख लोक तरी ठेपले असतील. भारताच्या राजधानीत इतक्या प्रचंड संख्येने प्रथमच गोळा झाले असतील इतके लोक ध्वजस्तंभाजवळ उभारलेला तो कट्टा एखाद्या वादळी समुद्रात तरंगणाऱ्या तराफ्यासमान भासत होता. त्या प्रचंड मानवी सागरलाटांनी तेथली प्रत्येक व्यवस्था कोलमडून टाकली. खुर्च्या, प्रेक्षक सज्जे, अडथळ्यासाठी बांधलेले दोरखंड, वाद्यवृंदासाठीचे व्यासपीठ वगैरे. जमावाला काबूत आणण्याचे कष्ट घेणारे पोलीस हात चोळत बसले. दुसरे काय करणार बिचारे ! असल्या या धुमश्चक्रीत छत्तरपूरचा रणजितलाल व त्याची बायकापोरे सापडली. बरोबर आणलेली शिदोरी सोडून खायला त्यांना सवड किंवा जागाच मिळेना. हातातोंडाची गाठ पडावी एवढीदेखील फट उरली नव्हती.

आपण आता तुडवल्या जाणार कमालीच्या…

गर्दीत लेडी माऊन्टबॅटनांच्या कार्यवाह एलिझाबेथ कॉलिन्स व म्युरिएल वॉट्सन सापडल्या. अगदी नटूनथटून आल्या होत्या. अचानक लोकांचा एक बेफाम लोंढा त्यांच्या अंगावर आला. आनंदाने बेभान झालेले व घामाने भिजून गेलेले अर्धनग्न सामान्यजन त्यांना ढकलू लागले. अक्षरशः उचलल्या गेल्या बिचाऱ्या. एकमेकींना घट्ट धरून ठेवत त्या तरंगत चालल्या. मोठ्या प्रयासाने स्वत:ला ताठ ठेवण्याचा प्रयत्न करू लागल्या. लेडी माऊन्टबॅटनांबरोबर अनेकदा युद्ध आघाडीवर जाऊन आलेली एलिझाबेथ घाबरून गेली. आपल्या मैत्रिणीचा हात घट्ट पकडून ठेवत ती म्युरिएलला म्हणाली, “गडे, आपण आता तुडवल्या जाणार कमालीच्या !” म्युरिएलने भोवतालच्या गर्दीकडे पाहून म्हटले – “परमेश्वराच्या कृपेने त्यांच्या पायात काही नाही हेही काही कमी नसे. ‘

गव्हर्नर जनरलांची सतरा वर्षांची कन्या- पामेला माऊन्टबॅटन आपल्या वडिलांच्या दोघा सहाय्यकांसमवेत समारंभस्थळी आली. कशीबशी वाट काढत ती तिघे त्या ध्वजस्तंभाजवळ येऊन पोचली. साधारण शंभर यार्डाच्या अंतरावर; पण तेथून पुढे माणसे इतक्या दाटीवाटीने चिकटून बसली होती की, श्वास घेण्याइतकीही मोकळी जागा नव्हती उरली तेथे. व्यासपीठावर बसलेल्या नेहरूंचे लक्ष तिच्याकडे गेले. ते तिच्या दिशेने ओरडले, “ ये, अशीच ये. लोकांना ओलांडून !” ती म्हणते “कसं शक्य आहे ते ? माझ्या पायांत उंच टाचेचे बूट आहेत ना !” “मग, काढून घे ते हातांत !” नेहरूंनी सुचवले. तसे करणे पामेलाला प्रशस्त वाटेना. अशा ऐतिहासिक समारंभात तसे बरे नाही दिसणार असे वाटून गेले तिला. “मग टाकून दे ते सरळ लोकांच्या अंगावरून चालायला लाग. त्यांना त्याचं काही वाटणार नाही.” नेहरूंनी मार्ग दाखवला. “नको हो ! त्याचा त्रास नाही का होणार त्यांना?” पामेलाची शंका. “मूर्खपणा नको करूस. घे हातात बूट आणि चालायला सुरुवात कर.” नेहरूंनी सुनावले.

“अरे देवा, आज आकाशातून पोरांचा पाऊस तर नाही पडत !”

एक दीर्घ सुस्कारा टाकून हताश पामेला आपल्यासमोर पसरलेल्या मानवी गालीच्यावरून धडपडत निघाली. तिच्या पायाखालच्या भोळ्याभाबड्या सामान्यजनांना त्याचे काहीच वाटले नाही. उलट, मोठ्या आनंदाने त्यांनी तिला हात दिला, तिच्या लटपटणाऱ्या पायांना आधार दिला, तिच्या हातातील चकचकीत बुटांचे त्यांनी मोठ्या औत्सुक्याने कौतुक केले. शेवटी एकदाची ती कशीतरी इच्छित स्थळी दाखल झाली. पण त्याच्यापाठोपाठ तिने जे पाहिले त्याला तोड नव्हती. माऊन्टबॅटनना घेऊन येणाऱ्या सरकारी सुवर्णरथाच्या आघाडीवर चालणाऱ्या अंगरक्षकांची झगझगीत शिरस्त्राणे नजरेच्या टप्यात आल्याआल्या त्या जनसागराची एक अवाढव्य लाट उसळली. त्या उसळीसरशी जमावातील स्त्रियांनी आपापल्या बालकांना छातीशी घट्ट कवटाळून घेतले. पण पुढच्याच क्षणी त्यांच्या ध्यानात आले की त्यांची धडगत उरणार नाही. नुसत्या कल्पनेने घाबरून गेलेल्या त्या बायाबापड्यांनी एखादा रबराचा चेन्डू हवेत भिरकावून द्यावा तशी आपली पोरे हवेत भिरकावयास प्रारंभ केला. एका क्षणात क्षितिजाच्या रेषेत शेकडो बालके हुंडरताना दिसू लागली. तरुण पामेला विस्फारित डोळ्यांनी ते अकल्पित दृश्य पाहून म्हणते “अरे देवा, आज आकाशातून पोरांचा पाऊस तर नाही पडत !” , असेही या
पुस्‍तकात नमूद करण्‍यात आले आहे.

जयजयकाराच्या गर्जना आकाश भेदून गेल्या

माऊन्टबॅटनना संभाव्य संकटाची चाहूल लागली. त्यांना स्वतःला रथातून खाली येताच येईना. त्यांनी नेहरूंना ओरडून सांगितले, “बाकीचे राहू द्या आता. नुसता ध्वज द्या फडकवून. बँडचा बाजा वाजलाय. सलामीचे सैनिक जाग्यालाच रुतलेत.” साहजिकच लोकांच्या गलबल्याच्या तालावर भारताचा राष्ट्रध्वज स्तंभावर चढला. माउन्टबॅटननी आपल्या जागेवरूनच त्याला औपचारिक अभिवादन केले. जमलेल्या पाच लाख मुखांतून जयजयकाराच्या गर्जना आकाश भेदून गेल्या. त्या विजय क्षणी भारताला प्लासीच्या लढाईचा, १८५७ च्या बदल्याचा, जालियनवाला बागेतील कत्तलीचा, लष्करी कायद्यांच्या पुकाराचा, पोलिसांच्या निर्घृण लाठी हल्ल्याचा, स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या देशभक्तांना हौतात्म्य देणाऱ्यांचा पार विसर पडला.

 निसर्गही पुढे सरसावला

त्या विजयक्षणाची मौज लुटताना गुलामगिरीची तीन शतके नजरेआड झाली. आणि काय गम्मत पाहा ! या ऐतिहासिक क्षणाला वेगळे तेज प्राप्त करून देण्यासाठी निसर्गही पुढे सरसावला. भारताच्या इतिहासातील त्या तेजस्वी क्षणाला दिव्यत्वाची झळाळी आणण्याकरता आकाशात इंद्रधनुष्याची शोभा विलसली. प्रत्येक घटना ग्रहमानाच्या मापाने मोजणाऱ्या भाविक भारतीयाला त्या प्रकाशाचा अर्थ समजला.

“स्वतः परमेश्वरच आपल्या पाठीशी उभा”

त्या इंद्रधनुषी रंगाच्या छटा त्यांच्या राष्ट्रध्वजाच्या रंगांशी केवढ्या मनोहारी विभ्रमांनी बिलगत होत्या ! आज प्रत्यक्ष परमेश्वर भारताच्या राष्ट्रध्वजाला अभय देत होता. आकाशात लखलखणारी ती शोभा पाहून व्यासपीठाजवळच्या घोळक्यातून एक विस्मयजनक उच्चार आला – ‘स्वतः परमेश्वरच आपल्या पाठीशी उभा असता कोणाची छाती आहे आमच्या आडवे येण्याची !”अशा रीतीने ध्वजारोहण समारंभ संपला.

‘त्या’ तिघी विस्फारलेल्या डोळ्यांनी, तोंडाला पदर लावून हसत होत्या

आता लुईस व एड्विना माऊन्टबॅटन राजभवनाकडे परतणार. त्या वेळचा त्यांचा अनुभव जन्मभर पुरूनही उतरण्याइतका विलक्षण होता. त्यांच्या त्या सुवर्णरथाला एखाद्या तराफ्याचे रूप आले. भोवताली नुसती माणसेच माणसे. सगळी आनंदात भिजून चिंब झालेली, उन्मादांनी उफाळलेली. लोकांनी जवाहरलाल नेहरूंना अक्षरश: डोक्यावर घेऊन गाडीत घातले. माऊन्टबॅटन म्हणतात “एकाच वेळी लाखो लोक आयुष्यात प्रथमच सहलीची मौज मनमुराद लुटत होते.” त्यांच्या त्या भावदर्शनापुढे माऊन्टच्या मनात असलेला थाटमाट बिलकुल तुच्छ वाटावा. आपल्या गाडीत उभे राहून माऊन्टबॅटनांनी जनतेच्या अभिवादनाचा हात हलवत स्वीकार केला. त्या कालखंडात तीन वेळा माऊन्टबॅटन पतीपत्नींनी गाडीबाहेर ओणवून गाडीखाली येणाऱ्या स्त्रियांना उचलून गाडीत बसवले. एकेकाळी इंग्लंडचे राजाराणी ज्या मऊमऊ गादीवर बसून मिरवत होते त्यावर बसण्याचे ‘भाग्य’ अचानक लाभलेल्या त्या तिघीजणी विस्फारलेल्या डोळ्यांनी, तोंडाला पदर लावून खिदखिदी हसत होत्या.

… आणि मिरवणूक हळूहळू पुढे सरकली

माऊन्टबॅटननी जतन करून ठेवावी अशी आणखी एक गोष्ट घडत होती तेथे. इंग्रजांच्या इतिहासात कोणाही राजवंशीय पुरुषाला लाभले नव्हते असे भाग्य त्यांच्या भाळी लिहिलेले आढळले त्यांना. तो अफाट जनसंमर्द अंत:करणाच्या ओलाव्यात भिजलेल्या तारस्वरांनी त्यांना धन्यवाद देत होता खुल्लमखुल्ला. त्यात एक प्रकारची वेगळी अकृत्रिमता होती, वेगळी आत्मीयता होती, निराळी नशा होती. मेघगर्जनेचा नाद घेऊन, आकाश फाडणारी घोषणा कानावर पडणारे माऊन्टबॅटन आयुष्यातला अपरिमित आनंद मोठ्या कृतज्ञतेने साठवत होते हृदयात. ‘माऊन्टबॅटन की जय !’ ‘माऊन्टबॅटन चिरायु होवोत !’ माऊन्टबॅटनांच्या राजकीय कर्तृत्वाला मिळणारी ती पोचपावती होती. दोघेही पतिपत्नी धन्य होत होती. मिरवणूक हळूहळू पुढे सरकली.

साभार : फ्रीडम ॲट मिडनाईट : लेखक डॉमिनिक लॉपिए/लॅरी कॉलिन्‍स (अनुवाद : माधव मोर्डेकर)

 

Back to top button