पुणे : भीमाशंकर रस्त्यावर खड्ड्यांचे जाळे | पुढारी

पुणे : भीमाशंकर रस्त्यावर खड्ड्यांचे जाळे

भीमाशंकर, अशोक शेंगाळे : श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग आहे. येथे देशातील कानाकोपर्‍यांतून लाखो भाविक देवदर्शनाला येत असतात. येथे अभयारण्य असल्याने निसर्गप्रेमींचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. या रस्त्याला वेडीवाकडी धोकादायक वळणे तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. परिणामी, अपघाताची शक्यता बळावली आहे.

जीर्ण झालेली झाडे तसेच वळणांवर झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. त्यामुळे वळण रस्ता समजून येत नाही. यातच घोडेगाव ते पिंळगाव-घोडे व पालखेवाडी ते तेरुंगण फाटा या ठिकाणी पडलेले खड्डे व सार्वजनिक बांधकाम विभागाचा ढिसाळपणा, अशा विविध कारणांमुळे अपघात होण्याच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे.

जीर्ण झाडे व झुडपे काढण्याची मागणी

जीर्ण झालेली झाडे व वाढलेली झाडेझुडपे काढण्याची मागणी होत आहे. घोडेगाव ते भीमाशंकर रस्त्याकडेने मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढली आहेत. मंचर-भीमाशंकर यादरम्यान शिंदेवाडी ते पिंपळगाव घोडेपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण वाढवून रस्त्याचे काम झाले आहे. मात्र, काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. राजपूर ते तेरुंगण फाटा तसेच अभयारण्य क्षेत्रात नवीन काँक्रीट रस्त्याला साइडपट्टीही काही ठिकाणी नसल्याने या ठिकाणी तात्पुरती दुरुस्ती करणे गरजेचे आहे.

फलकांची दुरुस्ती आवश्यक

अभयारण्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात धुके व पावसाच्या सरी असून, रस्ता किंवा समोरून आलेले वाहन दिसत नाही. यासाठी पावसाळी दिवसांमध्ये अभयारण्य परिसरात बसविलेल्या फलकांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. तसेच, साइडपट्ट्यांचे काम करून ठिकठिकाणी खड्डे भरून रस्तादुरुस्तीची मागणी भाविक, पर्यटक व स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

धोकादायक वळणांवर काम झाले पाहिजे

भीमाशंकरला पोखरी घाट ते मंदिरापर्यंत ठिकठिकाणी धोकादायक वळणे आहेत. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रामुख्याने धोकादायक वळणे काढून टाकली पाहिजेत किंवा त्या ठिकाणी असलेली झाडेझुडपे कमी केल्यास वाहनचालकाला समोरून आलेले वाहन दिसेल अशी सुविधा करणे गरजेचे आहे.

मंचर येथून भीमाशंकरला निघाल्यानंतर मंचर, निघोटवाडी, वडगाव काशिंबे, लांडेवाडी, नारोडी, घोडेगाव, शिंदेवाडी, पिंपळगाव घोडे, शिनोली, सुपेधर, डिंभे, पोखरी घाट, पोखरीच्या काही अंतराच्या पुढे तळेघर, निगडाळे या वळणांवर काही ठिकाणी दिशादर्शक फलकांची दुरवस्था झालेली दिसत आहे. काही ठिकाणी झाडाझुडपांमुळे दिशादर्शक फलक व सूचना फलक दिसतच नाहीत, तर किलोमीटरच्या आकडेवारीवरील झुडपे काढून टाकणे व सर्व फलक वाहनचालकांना दिसेल आदी गोष्टींकडे संबंधित खात्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

श्रावण महिना तसेच सुट्यांमध्ये भाविक, निसर्गप्रेमी व पर्यटक आपापल्या वाहनांमधून येत असतात. खासगी बस रस्त्याने सुसाट धावताना दिसतात. खासगी वाहनांमधून आलेल्या भाविकांनी वाहनचालकांची झोप झाली आहे का नाही, याची खात्री करून प्रवास करावा. एसटी बसचालकांनी हा रस्ता आपल्या पायाखालचा असल्याच्या भ्रमात न राहता ताबा मिळविता येईल असे वाहन चालविले पाहिजे.

                                                       – मारुती लोहकरे, संचालक, शरद सहकारी बँक

 

Back to top button