पुणे : मुळशीतील रस्ते जलमय | पुढारी

पुणे : मुळशीतील रस्ते जलमय

पौड : पुढारी वृत्तसेवा : मुळशी तालुक्यात गेल्या चोवीस तासांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाने तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून, पुणे-कोलाड रस्ता अनेक ठिकाणी खराब झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

जून कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र गेल्या चोवीस तासांत घाटमाथा, मुळशी धरण, कोळवण खोरे, रिहे खोरे, मुठा खोरे, पौड, पिरंगुट परिसरात पावसाने मुसळधार हजेरी लावली. पावसाने पौड बसस्थानकासमोरील रस्त्यावरून पाणी वाहत होते. खेचरे येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने बेलावडे भागाचा तर आंदेशे येथील ओढ्यावरून पाणी वाहत असल्याने मांदेडे भागाचा संपर्क तुटला होता. भादस भागात जाणार्‍या रस्त्यावरूनही पाणी वाहत होते. कोळवणकडे जाणार्‍या रस्त्यावर चिखलगांव येथे पाणी वाहत होते.

मंगळवारीही (दि.12) मुसळधार पाऊस चालूच असून पुणे कोलाड महामार्गावर लवळे फाटा, पिरंगुट, घोटावडे फाटा, सुतारवाडी येथे रस्त्यावर पाणी आले. रस्त्यावर आलेल्या पाण्याने रस्ता न झालेल्या ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडून खडीही उखडून वर आली. परिणामी वाहनचालकांना वाहने चालविणे कठीण झाले होते. तसेच मुख्य रस्त्यावरही अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.

Back to top button