चंद्रपूर : वाघाचा गोठ्यात ठिय्या! हूसकावून लावण्यात तब्बल ९ तासांनी यश | पुढारी

चंद्रपूर : वाघाचा गोठ्यात ठिय्या! हूसकावून लावण्यात तब्बल ९ तासांनी यश

चंद्रपूर (पुढारी वृत्तसेवा) : 11 जुलै 2022 : जनावरांच्या गोठ्यात तब्बल 9 तास ठिय्या मांडून बसलेल्या एका भल्या मोठ्या पट्टेदार वाघाला हुसकावून लावण्यात वन विभाग आणि पोलीस प्रशासनाला यश आले. फटाके फोडून या वाघाला हुसकावून लावण्यात आले.

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात शेगाव (बुज) येथील मधूकर भलमे यांच्या जनावरांच्या गोठ्यात  रविवारी (दि.10) दुपारच्या सुमारास एक भला मोठा पट्टेदार वाघ घुसल्याची घटना उघडकीस आली. मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट यामुळे या पट्टेदार वाघाने शेतशिवारातून मार्ग काढत थेट गावातील भलमे यांच्या जनावरांच्या गोठ्यात आश्रय घेतला. दुपारपासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत वाघ गोठ्यातच ठिय्या मांडून बसला होता.

वाघाला पाहण्यासाठी गर्दी

एरव्ही वाघ बघायचा असेल तर त्यासाठी नेहमी अभयारण्यात जावे लागते. मात्र, वाघाने गोठ्यात ठिय्या मांडल्याने पावसात वाघाला पाहण्यासाठी गावकऱ्यांसह परिसरात येणा-या पर्यटकांनी रविवारी दुपारपासून छत्र्या घेऊन गर्दी केली होती. चारगाव हा परिसर ताडोबा अभयारण्याला लागून आहे. शिवाय अनेक गावे या अभयारण्याला लागून असल्याने वाघांचे दर्शन हे नागरिकांना नित्याची बाब झाली आहे. परंतु भलमे यांच्या गोठयात वरच्या मजल्यावर थेट दुपारपासून पट्टेदार वाघाने रात्री 9 वाजेपर्यंत ठिय्या मांडल्याने पर्यटकांसाठी ती पर्वणी ठरली आणि त्यांनी पर्यटनाचा आनंद द्विगुणीत केला. एकीकडे पर्यटनाचा आनंद मिळत असला तरी रात्र होऊनही वाघ गोठ्यातून बाहेर पडत नव्हता त्यामुळे गावक-यांचा जीव टांगणीला लागलेला होता. तसेच गावकऱ्यांमध्ये प्रचंड दशहत पसरली होती.

गोठ्यात वाघ घुसल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली; परंतू वनविभागाचे अधिकारी चारगाव येथे उशिरा पोहचले. सोबत पोलिसही होते. सर्वप्रथम वाघाला सहजपणे हाकलण्याचा प्रयत्न झाला. परंतू वाघ गोठ्याबाहेर निघण्यास तयार नसल्याने बराच वेळ वन अधिकार्‍यांना यश येत नव्हते. रात्री गावात वाघ असणे म्हणजे गावक-यांना धोका असल्याने वाघाला हुसकावून लावण्यासाठी वन विभागाने वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या. अखेर गोठ्यालगत फटाके फोडण्यात आले. फटाक्याच्या आवाजाने वाघाने आपली जागा बदलण्याच्या हालचाली सूरू केल्या. या आवाजाने पट्टेदार वाघाला पळता भूई सुटली. त्यानंतर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास घेतला. तब्बल नऊ तासानंतर वाघ पळून गेल्यानंतर वन अधिकारी आणि पोलिसांचा ताफा परतला.

हेही वाचा

Back to top button