2050 पर्यंत समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक | पुढारी

2050 पर्यंत समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक

कॅलिफोर्निया : संपूर्ण जगभरात सध्या प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वाढत असलेले प्लास्टिकचे प्रमाण कमी करण्यासाठी भारतासह काही देशांनी ‘सिंगल यूज’ प्लास्टिकवर बंदी घातली आहे. मात्र, वाढत असलेल्या प्लास्टिकच्या वापरामुळे पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या अनेक खास प्रजाती लुप्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सध्या जगात प्लास्टिकचा प्रचंड प्रमाणात वापर करण्यात येत असल्याने दररोज हजारो टन प्लास्टिक कचरा तयार होत आहे. अशा स्थितीत संयुक्त राष्ट्राने दिलेल्या इशार्‍यानुसार 2050 पर्यंत समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक असेल. संयुक्त राष्ट्राच्या मते, जगभरात रोज तयार होत असलेल्या प्लास्टिक कचर्‍याचे रिसायकलिंग होईनासे झाले आहे. अशा स्थितीत बहुतेक ठिकाणी शेकडो टन प्लास्टिकचा कचरा समुद्रात मिसळत आहे. या कारणामुळे समुद्राच्या प्रदूषणाची पातळीही वेगाने वाढू लागली आहे.

सातत्याने समुद्रात प्लास्टिक कचर्‍याची भर पडत असल्याने सागरी जीवांची संख्या वेगाने कमी होत आहे. अशा स्थितीत 2050 पर्यंत समुद्रात माशांपेक्षाही प्लास्टिकचे प्रमाण जास्त असेल, असा इशारा संयुक्त राष्ट्राने दिला आहे. प्लास्टिक कचर्‍याची समस्या निकालात काढण्याच्या दृष्टीने विचार करण्यासाठी 27 जून ते 1 जुलै 2022 या काळात केनिया आणि पोर्तुगालच्या सरकारने संयुक्तपणे संयुक्त राष्ट्र महासागर संमेलनाचे आयोजन केले होते. दरम्यान, एका आकडेवारीनुसार जगभरात वर्षाला 30 कोटी टनांहून प्लास्टिक तयार होते. यातील सुमारे एक कोटी टन प्लास्टिक कचरा समुद्रात फेकला जातो. यामुळे 10 कोटी सागरी जीवांचा मृत्यू होतो.

Back to top button