एकनाथ शिंदे गटाकडून आसाममधील पूरग्रस्तांना ५१ लाखांची मदत | पुढारी

एकनाथ शिंदे गटाकडून आसाममधील पूरग्रस्तांना ५१ लाखांची मदत

पुढारी ऑनलाईन डेस्क : आसाममधील पूरग्रस्तांना एकनाथ शिंदे गटाने ५१ लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती स्वतः एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत दिली आहे. आसाममधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत ५१ लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

राज्यातील सत्तासंघर्षाचा आजचा दहावा दिवस आहे. तर गेली ९ दिवस एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांचा गुवाहाटीतील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये मुक्काम होता. तेथून हे आमदार आता गोव्याला जाण्यासाठी निघाले आहे. उद्या विशेष विधिमंडळ अधिवेशन होणार असून या दरम्यान ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश जारी केल्यानंतर एकनाथ शिंदे गटाचे ५१ आमदार गुवाहाटीवरुन आज सायंकाळी साडेचार वाजता खासगी विमानाने गोव्यात पोहोचणार आहेत. त्यासाठी ७१ खोल्या आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यानंतर गोव्यातून ते उद्या सकाळी ते मुंबईला पोहोचतील.

हे बंडखोर आमदार बंडानंतर पहिल्यांदा मुंबईत येणार आहेत. या आमदारांच्या विरोधात शिवसैनिकांमध्ये रोष आहे. त्यामुळे हे आमदार मुंबईत आल्यानंतर शिवसैनिकांकडून त्यांना विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आमदारांची सुरक्षाही पोलिसांपुढील मोठे आव्हान आहे. काल संध्याकाळी विधिमंडळ सचिवांनी त्या संदर्भात दोन बैठका घेतल्या. सभागृहाबाहेरची सुरक्षाही मुंबई पोलिसांची जबाबदारी असून विधानभवनाच्या आवरात आणि सभागृहातील सुरक्षेची जबाबदारी ही विधिमंडळ सचिवालयाची आहे. त्यामुळे या दोन्ही यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

उद्या गुरूवार ३० जून रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारची अग्निपरीक्षा उद्याच होणार आहे. राज्यपालांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. विशेष अधिवेशन उद्या (दि.३०) सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान होईल. सभागृहाच्या कामकाजाचे लाइव्ह टेलिकास्ट केले जावे, असेही निर्देश राज्यपालांनी दिले आहेत.

Back to top button