भंडारा : कोंबडीवरील वाद बेतला जीवावर; भांडणात वृद्धाचा मृत्यू | पुढारी

भंडारा : कोंबडीवरील वाद बेतला जीवावर; भांडणात वृद्धाचा मृत्यू

भंडारा;  पुढारी वृत्तसेवा : घरात कोंबडी येत असल्याच्या वादातून झालेल्या भांडणात एका वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना पवनी तालुक्यातील कातुर्ली येथे सोमवारी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध अड्याळ पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

बिहारी पांडुरंग उके (७५) रा. कातुर्ली असे मृत झालेल्या वृद्धाचे नाव आहे. तर गंगाबाई पंढरी मेश्राम (वय ७०), अनंत उर्फ आनंद पंढरी मेश्राम (वय ४५) आणि पुष्पा आनंद मेश्राम (वय ४०) तिनही रा. कातुर्ली ता. पवनी अशी आरोपींची नावे आहेत.

सोमवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास गंगाबाई, अनंत आणि पुष्पा यांनी कोंबडी घरात येण्याचा कारणावरुन बिहारी आणि त्यांच्या पत्नीशी भांडण करण्यास सुरुवात केली. भांडण अधिकच विकोपाला गेल्यानंतर अनंत याने बिहारी यांना जोरदार धक्का मारला. त्यामुळे बिहारी जागीच बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळले.

बिहारी यांची नात निकीता उके हिने त्यांना अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारकरीता दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनास्थळी ठाणेदार सुधिर बोरकुटे, पोलिस उपनिरीक्षक हरिचंद्र इंगोले, पोलिस शिपाई रामकृष्ण बावणकुळे, संदिप नवरखेडे यांनी भेट दिली. याप्रकरणी तिनही आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०२, ३२३, ५०४, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

हेही वाचा

Back to top button