बाळासाहेब आणि शिवसेनेचं नाव अन्य कोणालाही वापरता येणार नाही, उद्धव ठाकरेंचा बंडखोरांना इशारा | पुढारी

बाळासाहेब आणि शिवसेनेचं नाव अन्य कोणालाही वापरता येणार नाही, उद्धव ठाकरेंचा बंडखोरांना इशारा

मुंबई; पुढारी ऑनलाईन : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना भवनमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या शिवसेना कार्यकारिणीच्या बैठकीत पाच ठराव मंजूर करण्यात आले असल्याचे समजते. शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहेत. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांचीच होती, आहे आणि कायम राहील, असा महत्वाचा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव अन्य कोणालाही वापरता येणार नाही. शिवसेनेची मराठी अस्मितेशी आणि हिंदुत्वाशी बांधिलकी कायम राहील, असे ठराव कार्यकारिणीत मंजूर करण्यात आले आहेत.

दरम्यान, शिवसेना आणि बाळासाहेबांचं नाव कुणीही वापरू नये, असे पत्र शिवसेनेने निवडणूक आयोगाला पाठवले आहे. ”काही लोक मला काहीतरी बोला असे सांगत आहेत. पण मी आधीच सांगितले आहे की बंडखोर आमदारांना जे काही करायचे आहे ते करू शकतात. मी त्यांच्या बाबतीत हस्तक्षेप करणार नाही. ते स्वत: निर्णय घेऊ शकतात, पण बाळासाहेब ठाकरे यांचे नाव कोणीही वापरू नये, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि पक्षाच्या अन्य आमदारांनी पक्षनेतृत्वाविरुद्ध बंड केल्याने मुंबईतील सेना समर्थकांमधून हिंसक प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. संतप्त शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांच्या कार्यालयांची तोडफोड सुरु केल्याने शहरात कायदा व सुव्यवस्थेचा निर्माण होऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे आणि कायदा व सुव्यवस्थाचे सह आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी मुंबईतील सर्व अप्पर पोलीस आयुक्त व पोलीस उप आयुक्त यांची बैठक घेतली आहे. यात मुंबई शहरात कलम 144 सीआरपीसी अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश पाळण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत.

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी घेतलेल्या बैठकीत सध्याच्या राजकीय परीस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. मुंबई शहरातील सर्व राजकीय पक्षांची कार्यालये, मंत्री, खासदार, आमदार व महत्वाचे नगरसेवक यांची कार्यालये, निवासस्थान, शाखा अशा ठिकाणी बंदोबस्त वाढविण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. सोबतच स्थानिक राजकीय व्यक्तींसोबत समन्वय ठेवून आगाऊ माहिती काढण्याच्या सुचना स्थानिक पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत.

Back to top button