मुंबई : शिवसेना नव्याने उभी करा! उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना हाक | पुढारी

मुंबई : शिवसेना नव्याने उभी करा! उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना हाक

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : हिम्मत असेल तर शिवसेना आणि बाळासाहेबांचे नाव न घेता लोकांमध्ये जाऊन दाखवा, असे आव्हान देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रथमच बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यावर थेट हल्‍ला चढवला. शुक्रवारी राज्यभरातील शिवसेना जिल्हाप्रमुख आणि पदाधिकार्‍यांशी ऑनलाईन संवाद साधत उद्धव म्हणाले, मी वर्षा बंगला सोडला, लढण्याची जिद्द नव्हे! आधी कोरोना, मग माझे आजारपण यात भाजपने डाव साधला.

भाजपासोबत जावे यासाठी माझ्यावर काही आमदारांचा दबाव आहे. मात्र, माझ्या कुटुंबावर, मातोश्रीवर घाणेरडे आरोप करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही, अशा शब्दांत भाजपसोबत जाण्याची कल्पनाच उद्धव यांनी फेटाळली. शिवसेना नव्याने उभी करा, अशी हाक देतानाच त्यांनी बंडखोरांना ठणकावून सांगितले की, मी शांत आहे, षंढ नाही.

शिवसेनेचे तब्बल 40 आमदार बंडखोरांच्या तंबूत दाखल झाले आहेत. सरकार त्या अर्थाने अल्पमतात आले असून राजकीय संघर्ष निर्णायक वळणावर पोहचण्याची चिन्हे आहेत. या तणावपूर्ण परिस्थितीत वर्षा बंगला सोडून मातोश्री मुक्‍कामी दाखल झालेले उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसेना भवनात एकवटलेल्या आपल्या जिल्हाप्रमुखांशी, मुंबईतील विभागप्रमुखांशी आणि सेनेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांशी मातोश्रीतूनच ऑनलाईन संवाद साधला.बंडखोरांनी गुवाहाटीतून पाठवलेल्या पत्रात उद्धव यांना बडव्यांनी घेरल आहे. असा उल्‍लेख केला होता.

सेनेचे मुख्यमंत्री असूनही सेनेच्या आमदारांना भेट मिळत नव्हती. अशी तक्रारही या पत्रात करण्यात आली. त्यावर अत्यंत आक्रमक उत्तर उद्धव यांनी दिले. ते म्हणाले, आधी बाळासाहेब विठ्ठल आणि आम्ही बडवे, आता मी विठ्ठल आहे आणि आदित्य बडवा आहे. एकनाथ शिंदेंसाठी मी सर्व काही केले. जे खाते नेहमी मुख्यमंत्र्याकडे असते ते नगरविकास मंत्रालय मी शिंदेंकडे सोपवले. माझ्याकडची दोन खातीही दिली संजय राठोड यांचे वनखाते माझ्याकडे घेतले. साधी खाती माझ्याकडे ठेवली. त्यांचा स्वत:चा मुलगा खासदार आहे आणि माझ्या मुलाबद्दल आता आरोप केले जात आहेत. माझ्या मुलाने काहीच करायचे नाही का? मला आता या सर्व आरोपांचा वीट आला आहे. ही वीट अशीच ठेवून चालणार नाही तर अशा लोकांच्या डोक्यात ती हाणणार आहे.

भाजपने डाव साधलास्वप्नातही या पदावर जाईन असा विचार केला नव्हता. त्या पदाचा मला कधीच मोह नव्हता. मला स्वप्नातही कोणी वर्षा की मातोश्री विचारलं तर मातोश्रीच उत्तर असेल, असे सांगून उद्धव म्हणाले, सत्ता आल्यानंतर आधी कोरोना आला. त्यानंतर माझे आजारपण आले. माझ्या मानेवर शस्त्रक्रिया गरजेची होती. मोदीही म्हणाले होते, ऑपरेशन हे हिंमतीचे काम आहे, पण हिंमत माझ्या रक्तातच आहे. पहिल्या ऑपरेशनच्या वेळी सगळं ठीक होते, मग शरीराला त्रास होऊ लागला. म्हणून दुसरे ऑपरेशन केले. त्याचा फायदा घेत विरोधकांनी डाव साधण्याचा प्रयत्न केला. मी बरा होऊ नये म्हणून काही जण पाण्यात देव ठेऊन बसलेले होते, असा आरोप उद्धव यांनी केला.

शिवसेना माझ्यासोबतशिवसेनेत बंड झाल्यानंतर आजवर दोन वेळा शिवसेना सत्तेत आली आणि दोन्ही वेळा मी त्यांना महत्वाची पदे दिली. तुम्हाला हवे आहेत तितके आमदार घेऊन जा. पण जोपर्यंत बाळासाहेबांनी रुजवलेली मुळं आहेत तोवर शिवसेना संपणार नाही. जे सोडून गेलेत ते माझे कधीच नव्हते. मूळ शिवसेना माझ्यासोबत आहे. ज्यांना आपण मोठे केलं त्यांची स्वप्ने मोठी झाली.

महत्त्वाकांक्षा जरूर असावी पण त्यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा मी पूर्ण करू शकत नाही. त्यांनी खुशाल जावे. बुडते ती निष्ठा आणि तरंगते ती विष्ठा. सेनेत माझ्यासोबत जी बुडेल ती निष्ठावंत सेना आहे, असे उद्धव म्हणाले. निधी मिळाला नसल्याच्या तक्रारीत तथ्य नाही, असे उद्धव यांनी सांगितले. काही आमदार तिकीट कापलं तरी जाणार नाही असं म्हणाले ते. पण आता गेले आहेत तर जाऊ द्या. निधी मिळाला नाही म्हणून अनेकांनी तक्रारी केल्या. मी तर सर्व पातळीवर निधी वाटपाचं काम करत आलो आहे, असे त्यांनी स्पष्ट केले

 

Back to top button