‘‘एकनाथ शिंदे गटाला ‘शिवसेना’ हे नाव वापरता येणार नाही’’ | पुढारी

‘‘एकनाथ शिंदे गटाला ‘शिवसेना’ हे नाव वापरता येणार नाही’’

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा आजचा चौथा दिवस आहे. शिंदेंच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या राजकीय पेचावर तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांचे या घटक पक्षातील वरीष्ठ नेते स्वतंत्र बैठका घेत आहेत. आज सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री निवासस्थानी भेट घेऊन पुढील रणनिती ठरवणार आहेत.

दरम्यान, शिंदे गट आपल्या मागण्यांवर ठाम असून उद्धव ठाकरे आणि पक्षाच्या इतर नेत्यांकडून बंडखोर आमदारांना मुंबईत येऊन चर्चा करण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, या आवाहनला शिंदे गटाने नकार दिला. तसेच, कालपासून शिवसेनेतील आणखी काही आमदार शिंदे गटात सामील झाले आहे. त्यामुळे सध्या शिंदे गटात ४० हून अधिक शिवसेना आमदार आणि १० हून अधिक अपक्ष आमदार असल्याची माहिती आहे. आता यापुढे काय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या नेत्या निलम गो-हे यांनी आज काही कायदेशीरबाबी माध्यमांसमोर उघड केल्या. त्या म्हणाल्या की, एकनाथ शिंदे गटाला शिवसेना हे नाव वापरता येणार नाही. त्यांना शिवसेना हे नाव, तसेच पक्षाचे चिन्ह मिळणार नाही. या गटाला भाजप किंवा प्रहार संघटनेत विलीन व्हावं लागेल, अशी त्यांनी माहिती दिली.

Back to top button